अमोल मिटकरींनी थेट नावचं घेतलं…
28 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. या दिवशी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाला आता काही महिने पूर्ण होत असले तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अद्यापही अजित दादांच्या जाण्याचे दु:ख आहे.
जाहीर कार्यक्रमांमधून अजितदादाविषयी नेते आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. मात्र, अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सांगली येथील एका कार्यक्रमात मिटकरींनी या अपघाताच्या मास्टरमाईंडचे नाव जाहीर करत गंभीर आरोप केले आहेत.
‘अजितदादांच्या विमान अपघाताचा मास्टरमाईंड व्हीआरएस विमान कंपनी व त्याचा मालक व्ही के सिंग आणि डीजीसीएचे अधिकारी आहेत’, असा थेट आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
या साऱ्यांवर सदोष्य नुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत आपण गप्प बसणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. त्याचबरोबर व्हीआरएस कंपनी, मालक आणि डीजीसीए अधिकाऱ्यांना कोण वाचवतंय? असा सवालही मिटकरींनी उपस्थित केला आहे.
तसेच अशोक खरात आणि व्हीके सिंग यांच्यात संबंध असल्याचे फोटो समोर आल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
“जस्टिस फॉर दादा” संवाद यात्रा काढणार
अजित पवारांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रात जस्टिस फॉर दादा संवाद यात्रा काढण्यात येणार असल्याचे अमोल मिटकरींनी जाहीर केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी 14 मे रोजी या यात्रेला सुरुवात होणार असून प्रत्येक गावात जाऊन अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव देखील घेण्यात येणार असल्याचे मिटकरींनी सांगितले.
सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात
दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीसाठी अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ कन्हेरी येथील हनुमान मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. या प्रचार सभेनंतर पक्षातील कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून, तालुक्यातील प्रत्येक गावात जात सुनेत्रा पवारांना निवडणूक देण्याचे आवाहन केले जात आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ युवा नेते आणि अजित पवारांचे सुपुत्र जय पवार हे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागाचा दौरा करत आहेत. पवार कुटुंबातील सर्वच जण सुनेत्रा पवारांच्या पाठिशी ठामपणे उभे असून, आमदार रोहित पवार यांनी देखील दादांकडे बघून सुनेत्राकाकांनी निवडणूक आणायचं असल्याचे म्हटले आहे.
