नारी शक्ती वंदन विधेयकाशी जोडलेल्या १२३व्या घटनादुरुस्ती विधेयकावरून सत्ताधारी मोदी सरकार आणि विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत लोकसभेत दोनतृतीयांश मतांकन सुरू असलेल्या संघर्षात कोणाची सरशी होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत केलेल्या भाषणांवरून त्यांची देहबोली सकारात्मक वाटत असली तरी, काल झालेल्या मतविभाजनाच्या आकड्यांनी सरकारची धाकधूक वाढवली आहे. तरीही शुक्रवारी सायंकाळी होणाऱ्या मतदानात ‘चमत्कार’ घडेल, अशी आशा सत्ताधाऱ्यांना आहे.
लोकसभेच्या ५४० खासदारांच्या सभागृहात १२३ वी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी ३६० मतांची आवश्यकता आहे. सभागृहात किमान ५० टक्के खासदारांची उपस्थिती आणि उपस्थितांपैकी दोनतृतीयांश खासदारांच्या बहुमताच्या जोरावर या घटनादुरुस्ती विधेयकाचे भवितव्य ठरणार आहे. त्यात कोणाची सरशी होणार याची झलक बघायला मिळाली. मोदी सरकारच्या वतीने मांडलेले घटनादुरुस्ती सभागृहाने विचारात घ्यावे की नाही, यावर झालेल्या मतविभाजनात काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकसह छोट्यामोठ्या पक्षांचा समावेश असलेल्या विरोधी ‘इंडिया’ आघाडीची एकजूट मोदी सरकारची झोप उडविणारी ठरली.
या मतविभागणीत मोदी सरकारच्या बाजूने २५९ तर विरोधकांच्या बाजूने १८५ मते पडली. उद्या, सायंकाळी होणाऱ्या मतदानात सभागृहात सर्व ५४० सदस्य उपस्थित राहिले तरीही इंडिया आघाडीची १८५ मते हा दोन तृतीयांश बहुमताला नाकारणारा आकडा ठरणार आहे. हे विधेयक पराभूत करण्यासाठी विरोधकांची १८१ मते पुरेशी असल्यामुळे या चर्चेत कोणाची सरशी झाली? यापेक्षा हा आकडा महत्त्वाचा ठरला आहे
दरम्यान, विरोधी पक्षांच्या या एकजुटीला आज ‘गळती’ लागेल. विरोधी पक्षातील खासदार मोदी सरकारच्या गळतीला लागतील. काही खासदार सभागृहातच उपस्थित राहणार नाहीत, तर काही खासदार उपस्थित राहून मतदान करणार नाही आणि मतदान केल्यास विधेयकांच्या बाजूने करतील, या आशेवर आता हे घटनादुरुस्ती विधेयक ताकदले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची जादू होऊन विरोधकांवर डाव उलटेल, ही सत्ताधाऱ्यांची अपेक्षा फारशी खरी ठरली नाही. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेविषयी विरोधी पक्षांना असलेल्या शंकांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. पण तोही फारसा परिणामकारक ठरला नाही. आता याआज संध्याकाळपर्यंत त्यांची सभागृहाबाहेरची रणनीती किती प्रभावी ठरते यावरच सर्वकाही अवलंबून आहे.
