इस्लामाबाद मिटिंगपूर्वीच मोठा ट्विस्ट; जगातील हा बलाढ्य नेता…
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या इस्लामाबाद शहरात या आठवड्यात होणाऱ्या महत्त्वपूर्ण शांतता चर्चेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.
रिपोर्ट्सनुसार, जर करार झाला, तर डोनाल्ड ट्रम्प इस्लामाबादमध्ये इराणसोबतच्या शांतता चर्चेत वैयक्तिकरित्या सहभागी होऊ शकतात. ते प्रत्यक्ष उपस्थित राहतील की त्यांची उपस्थिती ऑनलाइन असेल, हे अद्याप स्पष्ट नाही.
दोन्ही देशांमधील अडलेलं चर्चेचं घोडं पुढे सरकत असून ती बुधवारी होण्याची शक्यता आहे ,असं एका पाकिस्तानी सूत्राने सांगितल्याचं रॉयटर्सच्या वृत्तात नमूद करण्यात आलं. याच दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचा चर्चेतील संभाव्य सहभाग ही एक मोठी घडामोड आहे, कारण इराणने आता इस्लामाबादला येण्यास सहमती दर्शवली आहे. तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यातील दोन आठवड्यांची शस्त्रसंधी बुधवारी संपत असून हा युद्धविरामा आता तो वाढवला जाण्याची शक्यता नाही, असं ट्रम्प यांनी आधीच म्हटलं होतं.
इराण आणि अमेरिकेदरम्यान होणारी शांतता चर्चा सातत्याने ठप्प होत असतानाच ही बातमी समोर आली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडियावर सक्रिय असून, इराणने तडजोड केलीच पाहिजे, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी तडजोड न केल्यास इराणवर बॉम्बहल्ला करण्याची धमकी ट्रम्पनी नुकतीच दिली होती. इराणनेही आपली भूमिकेवर कायम असला तरी, आता ते आपल्या प्रतिनिधींसह चर्चेत सहभागी होणार असल्याचे वृत्त समोर आलं आहे.
शांतता चर्चेबाबत काय अपडेट ?
युद्धविरामाननंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील प्रस्तावित (दुसऱ्या) शांतता चर्चेसंदर्भातील परिस्थिती अजूनही अस्पष्ट आहे. एकीकडे अमेरिकेच्या अटींमुळे संतापलेल्या इराणने त्यात सहभागी होण्यास नकार दर्शवला होता, मात्र आता परिस्थिती बदलत असून या चर्चेत सहभागी होण्याचा विचार तेहरान करत आहे, असे संकेत मिळत आहेत. सरकार चर्चेत सहभागी होण्याच्या पर्यायावर सकारात्मक विचार करत असल्याचं एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने सांगितल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं होतं.
मात्र अमेरिकेच्या कारवाईनंतर, विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणचे जहाज जप्त केल्यामुळे, इराणने या चर्चेतून माघार घेत असल्याचे यापूर्वीच सूचित केले होते. दुसरीकडे, पाकिस्तानमधील चर्चा नियोजित वेळेनुसार पार पडेल, असा विश्वास अमेरिकेने व्यक्त केला आहे.
कुठे अडकली चर्चा ?
तेलाच्या किमतींमधील वाढ आणि शेअर बाजारातील अस्थिरता रोखेल असा करार डोनाल्ड ट्रम्प यांना हवा आहे. तसेच इराणला अण्वस्त्रे विकसित करण्याची क्षमता दिली जाऊ शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपल्या वर्चस्वाचा वापर करून इराण अमेरिकेसोबत असा करार करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे युद्धाची पुनरावृत्ती होणार नाही, निर्बंधांमध्ये सूट मिळेल मात्र त्यांच्या अणुकार्यक्रमावर कोणतेही निर्बंध घातले जाणार नाही. आता लवकरच होणाऱ्या चर्चेत काय तोडगा निघतो याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
