ट्रम्प यांना मोठा धक्का…
इराणसोबत चर्चा करण्याआधीच अमेरिकेच्या सत्तेत उलथापालथ झाली असून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या कामगार सचिव लोरी चावेज-डेरेमर यांच्या राजीनाम्याबाबत मोठा खुलासा समोर आला आहे.
कामगार संकटाच्या काळात सरकारी निधीचा वापर करून पूल पार्टी आयोजित केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. प्राथमिक चौकशीनंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला. हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील अलीकडील तिसरा राजीनामा मानला जात आहे.
वादाची सुरुवात कशी झाली?
माध्यमांतील अहवालांनुसार, सरकारी कामकाज बंद (शटडाउन) असताना पूल पार्टी आयोजित केल्याचा आरोप लोरी चावेज-डेरेमर यांच्यावर करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सरकारी निधी वापरल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.
गैरवर्तनाचे गंभीर आरोप
चौकशीत त्यांच्या वर्तणुकीबाबतही अनेक आरोप समोर आले. जसे की, कर्मचाऱ्यांवर ओरडणे आणि कठोर वागणूक, कामाच्या वेळेत मद्यपान केल्याचा आरोप. अधिकाऱ्यांना सरकारी खर्चातून वैयक्तिक दौऱ्यावर पाठवणे. या सर्व मुद्द्यांमुळे त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
शटडाउनदरम्यान पूल पार्टीचा वाद
ऑक्टोबर २०२५ मध्ये अमेरिकन सरकारचे कामकाज बंद असताना त्या मित्रांसोबत पूल पार्टीत सहभागी झाल्याचे समोर आले. या घटनेमुळे सार्वजनिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि प्रकरण अधिकच गंभीर झाले.
प्राथमिक तपासात काय उघड झालं?
प्राथमिक तपासात काही आरोपांना आधार मिळाल्याचे सांगितले जात आहे. कामाच्या वेळेत क्लबमध्ये जाणे आणि सरकारी निधीचा गैरवापर केल्याचे मुद्दे तपासात समोर आले. यानंतर तपास अहवाल सिनेटकडे पाठवण्यात आला.
व्हाइट हाऊसची प्रतिक्रिया
व्हाइट हाऊसचे प्रवक्ते स्टीवन चेउंग यांनी सांगितले की, डेरेमर यांनी खाजगी क्षेत्रात काम करण्यासाठी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कामगार क्षेत्रासाठी केलेल्या कामाचेही कौतुक केले.
राजीनाम्यामुळे राजकीय खळबळ
या प्रकरणामुळे अमेरिकन राजकारणात खळबळ उडाली असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. सलग तिसरा मंत्री राजीनामा देत असल्याने सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
