ठाणे प्रतिनिधी (नागेश पवार) दिवा : वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना, ठाणे महानगरपालिकेने शहरातील सर्व्हिस सेंटरमध्ये १० जूनपर्यंत वाहन धुण्यावर निर्बंध घातले आहेत. महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, एकीकडे प्रशासन निर्बंधांची भाषा करत असताना, दुसरीकडे दिवा शहरातील विकास म्हात्रे गेटजवळील साईबाबा मंदिराजवळ पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साईबाबा मंदिराजवळ असलेली पाईपलाईन मोठ्या प्रमाणात फुटली असून, त्यातून पाण्याचे कारंजे हवेत उडत आहेत. या पाणी गळतीमुळे संपूर्ण रस्ता जलमय झाला असून, गेल्या कित्येक तासांपासून हे मौल्यवान पाणी गटारात वाहून जात आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने पाणी बचतीसाठी नागरिकांवर निर्बंध लादले आहेत, पण स्वतःच्या यंत्रणेतील अशा गळतीकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.
नागरिकांमध्ये संताप
“आम्हाला पाणी वापरण्यावर निर्बंध घातले जात आहेत, गाड्या धुण्यास मनाई केली आहे, हे आम्ही समजू शकतो. पण प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अशा प्रकारे पाणी वाया जात असेल, तर त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल दिवा येथील नागरिक विचारत आहेत.
एकीकडे धरणे आटत चालली आहेत, विहिरींची पातळी खालावली आहे आणि दुसरीकडे अशा गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. महापौरांनी नागरिकांना ‘पाणी वाचवा’ असे आवाहन केले असले, तरी आधी अशा मोठ्या गळती रोखणे ही पालिकेची प्राथमिक जबाबदारी नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
प्रशासनाने तातडीने या गळतीची दखल घेऊन दुरुस्ती करावी आणि होत असलेली पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. अन्यथा, प्रशासनाचे ‘पाणी बचत’ अभियान केवळ कागदावरच मर्यादित राहील, अशी भीती व्यक्त होत आहे.
