महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेला भोंदू अशोक खरातची पोलिसांच्या एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर चौकशीत उडावाउडवीची उत्तरे देणाऱ्या खरातचा माज उतरला असून आता सहकार्य करत असल्याची माहिती आहे.
मात्र, मंगळवारी खरातच्या प्रकृतीबाबत मोठी घडामोड झाली.
विशेष तपास पथकाच्या (SIT) कोठडीत असलेल्या आरोपी खरातची प्रकृती अचानक खालावल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली. मंगळवारी सकाळी खरातला कोठडीत असतानाच तीव्र मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्याची प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.
अशोक खरात हा मागील ३५ दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. त्याला आतापर्यंत विविध गुन्ह्याप्रकरणी १२ वेळा कोर्टात हजर करण्यात आले आहे. खरातविरोधात आतापर्यंत १८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी त्याला ५ गुन्ह्यात कोर्टात हजर करण्यात आले आहे. आधीच्या चार प्रकरणात त्याची पोलीस कोठडी संपून न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, पाचव्या गुन्ह्यात पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
५ आजारांनी ग्रस्त आहे खरात
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खरात हा गेल्या काही दिवसांपासून विविध व्याधींनी ग्रस्त आहे. तो सध्या मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या एकूण पाच वेगवेगळ्या आजारांवर औषधोपचार घेत आहे. कोठडीत असताना त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात होते, परंतु गेल्या काही दिवसांत त्याचे वजन लक्षणीयरीत्या घटले असल्याचे समोर आले आहे. शरीरातील अशक्तपणा आणि सततचा तणाव यामुळे त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
खरातची प्रकृती ढासळली, पोलिसांची पळाप
मंगळवारी सकाळी जेव्हा खरातला उलट्यांचा त्रास सुरू झाला, तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस अकादमीच्या परिसरात तातडीने रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली. अचानक सायरन वाजवत आलेल्या रुग्णवाहिकेमुळे परिसरात तर्कवितर्कांना उधाण आले होते. तपासाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच मुख्य संशयित आरोपीची प्रकृती बिघडल्याने तपासावर याचा काय परिणाम होईल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
सध्या खरातला कडक पोलीस बंदोबस्तात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. कोठडीतील नियमांनुसार त्याला आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. तपासाच्या दबावामुळे की जुन्या आजारांमुळे ही परिस्थिती ओढवली, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण मिळालेले नाही. खरातच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरच पुढील चौकशीची प्रक्रिया पुन्हा वेग घेण्याची शक्यता आहे.
