अटकेच्या दिवशीच 58 लाखांची जमीन पत्नीच्या नावावर…
तंत्र-मंत्र आणि अघोरी पूजा करत अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. तसेच आता त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या साम्राज्यावर देखील मोठा घाला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) घातला आहे. त्याची कोट्यवधींची संपत्ती ताब्यात घेतली आहे. दरम्यान आता तपास त्याच्या आर्थिक व्यवहारांमधील अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. अशातच आता धक्कादायक माहिती समोर आली असून कोकणातील रायगड जिल्ह्यातील कोकणातील रायगड जिल्ह्यातील महसूलच नही तर निबंधक यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. येथे खरातच्या अटके दिवशाच फरार पत्नी कल्पना खरातच्या नावे जमीन खरेदीचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत असून नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर येथील जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती उघडून तब्बल 57 लाख 90 हजार 979 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद झाला असून बोगस गुंतवणूक, मनी लाँडरिंग आणि फसवणुकीच्या आरोपांत ईडीने देखील फास आवळला आहे. सध्या त्याची अनेक व्यवहारांत चौकशी सुरू असतानवाच कोकणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याआधीच अशोक खरात याचे जमीन व्यवहाराचे कोकणातील कनेक्शन उघड झाले होते. खरातने उरण तालुक्यातील चाणजे येथे जमीन घेतल्याचे उघड झालेले आहे. तर ज्या दिवशी अशोक खरातला अटक झाली त्याच दिवशी हा खरेदी व्यवहार झाल्याची माहिती उघड झाली आहे. तर ही जमीन त्याची फरार पत्नी कल्पना अशोक खरात हिच्या नावावर जमिनीच्या नोंद झाली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील महसूलसह निबंधक यंत्रणेच्या पारदर्शकतेवर मोठे सवाल उपस्थित केले जात आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अस्मिता अविनाश म्हात्रे व कैलास मिश्रीमल शहा यांच्याकडून जमीन नोंदणीकृत खरेदीखताद्वारे कल्पना खरात यांच्या नावावर १२ मार्च रोजी खेरदी व्यवहार झाला. जो सुमारे ५८ लाख ५० हजार रुपयांचा असल्याचे समजते. तर यानंतर अवघ्या पाचव्या दिवशी म्हणजेच १७ मार्च २०२६ रोजी तलाठी सजा चाणजे यांनी वर्दी नोटीस प्रसिद्ध केली. याच दिवशी अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.
या अटकेनंतरही व्यवहार थांबला नाही, तर १३ एप्रिल २०२६ रोजी फेरफार क्रमांक ८३५१ मंजूर करण्यात आला. याचा अर्थ अवघ्या एका महिन्याच्या आत संपूर्ण व्यवहाराची महसूल नोंद प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळेच आता उरणचे दुय्यम निबंधक, तहसीलदार, मंडळ अधिकारी (चाणजे) आणि तलाठी यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तसेच जमीन विक्रेते अस्मिता अविनाश म्हात्रे व कैलास मिश्रीमल शहा यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यामुळे आता या व्यवहाराची पडताळणी व कागदपत्रांची तपासणी करण्यासह सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी दबक्या आवाजात होताना दिसत आहे.
