पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता. पहलगामच्या शहिदांची शौर्यगाथा भारत विसरलेला नाही. आज देश त्यागाची आठवण काढत आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. तसंच, दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही, असा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“मागच्या वर्षी आजच्याच दिवशी पहलगाममध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या निरपराध लोकांना आपण आठवत आहोत. त्यांना कधीही विसरलं जाणार नाही. या मोठ्या दुःखाचा सामना करणाऱ्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. एक राष्ट्र म्हणून आपण या दुःख आणि निर्धाराच्या क्षणी एकत्र आहोत. भारत कधीही कोणत्याही प्रकारच्या दहशतवादासमोर झुकणार नाही. दहशतवाद्यांचे घृणास्पद हेतू कधीही यशस्वी होणार नाहीत’ असं पंतप्रधान मोदी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.
22 एप्रिल 2025 रोजी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अचानक अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात 26 निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी लोकांचे नाव आणि धर्म विचारून, महिलांसमोर आणि मुलांसमोरच त्यांना गोळ्या घातल्या. या घटनेमुळे संपूर्ण देशात संताप पसरला होता. हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेतली आणि ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचे ९ तळ शोधून नष्ट केली. यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले होतके. त्यानंतरही सैन्याचे अभियान सुरूच राहिलं. सर्वात मोठे यश 28 जुलै 2025 रोजी मिळाले, जेव्हा ऑपरेशन महादेव अंतर्गत सैन्याने त्या दहशतवाद्यांना शोधून ठार केलं, जे या हल्ल्यासाठी जबाबदार होते.
