पाकिस्तानमध्ये नेहमी काहीतरी भलतंच सुरु असतं. आता हे पाकिस्तानी लोक भविष्यातील नफ्याच्या आमिषाने इराणचे इराणी चलन ‘रियाल’ आणि तिथली जुनी नाणी मोठ्या प्रमाणावर जमा करत आहेत.
विशेष म्हणजे ही कोणतीही अधिकृत बँकिंग एक्सचेंज नसून, लोक अक्षरशः रद्दी किंवा कबाडच्या भावात हे चलन खरेदी करत असल्याचे दिसून येतेय.
इराणवरील आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि तिथली ढासळलेली अर्थव्यवस्था यामुळे रियाल हे जगातील सर्वात कमकुवत चलनांपैकी एक बनले आहे, ज्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न पाकिस्तानी नागरिक करत आहेत.
भविष्यात इराणची अर्थव्यवस्था सुधारली किंवा तिथले निर्बंध हटवले गेले, तर सध्या कवडीमोल भावात घेतलेल्या या रियालची किंमत अचानक गगनाला भिडेल.. असं पाकिस्तान लोकांना वाटतंय. हे लोक या चलनाकडे एका साध्या गुंतवणुकीपेक्षा ‘लॉटरीच्या तिकिटाप्रमाणे’ पाहत आहेत. अनेकांना असे वाटते की, आज जर लाखो रियाल अगदी कमी किमतीत खरेदी करून ठेवले, तर भविष्यात चलनाचे मूल्य वाढल्यावर ते एका रात्रीत करोडपती होतील. या श्रीमंत होण्याच्या ओढीमुळे लोक इराणी चलणावर तुटून पडले आहेत.
इराणची अवस्था बिकट
इराणमधील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, तिथल्या स्थानिक नागरिकांचा आता स्वतःच्या चलनावरचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे. प्रचंड महागाईमुळे इराणचे लोक रियालऐवजी डॉलर किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित मानत आहेत. मात्र, पाकिस्तानात नेमके याच्या उलट चित्र पाहायला मिळत असून तिथे रियालची मागणी वाढली आहे.
आर्थिक तज्ज्ञांनी या गुंतवणुकीबाबत मोठा इशारा दिला असून यामध्ये प्रचंड धोका असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानात या इराणी चलनासाठी कोणतीही अधिकृत एक्सचेंज मार्केट किंवा कायदेशीर यंत्रणा उपलब्ध नाही, त्यामुळे लोक जे काही व्यवहार करत आहेत ते पूर्णपणे अनधिकृत आहेत. जर भविष्यात इराणने आपले चलन पूर्णपणे बदलले किंवा तिथली आर्थिक परिस्थिती सुधारलीच नाही, तर या साठवलेल्या नोटा केवळ रद्दी कागदाचे तुकडे उरतील.
