चेहरा भाजल्याने शस्त्रक्रिया, इराणमध्ये लष्कराचा वाढता प्रभाव…
इराणच्या सत्ताकारणात मोठे बदल घडत असल्याचे चित्र समोर आले आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी एका गंभीर हल्ल्यात जखमी झाले असून, त्यांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एका आंतरराष्ट्रीय वृत्तानुसार, त्यांच्या चेहऱ्याला भाजल्यामुळे प्लास्टिक शस्त्रक्रिया करण्याची गरज भासली आहे. तसेच त्यांच्या शरीराच्या इतर भागांनाही दुखापत झाली आहे.
या हल्ल्यात खामेनी यांच्या पायाला गंभीर इजा झाली असून त्यावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सध्या ते कृत्रिम पायाच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या हातावरही शस्त्रक्रिया झाली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या चेहऱ्याला आणि ओठांना भाजल्यामुळे त्यांना बोलण्यास अडचण येत आहे.
या परिस्थितीमुळे खामेनी सार्वजनिकरीत्या दिसत नाहीत. त्यांनी स्वतःची कमजोरी जगासमोर येऊ नये म्हणून भाषण आणि सार्वजनिक कार्यक्रम टाळले आहेत. सध्या ते एका गुप्त ठिकाणाहून देशाचा कारभार पाहत आहेत. विशेष म्हणजे, संवादासाठी डिजिटल साधनांचा वापर न करता ते हाताने लिहिलेल्या चिठ्ठ्यांचा वापर करत आहेत. या चिठ्ठ्या विश्वासू लोकांमार्फत सुरक्षितपणे पोहोचवल्या जातात. खामेनी यांच्या प्रकृतीमुळे इराणमधील सत्तेचे स्वरूप बदलत असल्याचे दिसत आहे. पूर्वी सर्व निर्णय एका नेत्याकडे केंद्रीत असायचे, पण आता लष्करी अधिकाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे जनरल युद्ध, सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, खामेनी सध्या पूर्णपणे नियंत्रणात नाहीत. अनेक वेळा लष्करी अधिकारी आधीच निर्णय घेऊन त्यांना फक्त माहिती देत आहेत. त्यामुळे देशातील लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या नेत्यांची भूमिका कमी होत चालली आहे. या बदलाचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावरही दिसून येत आहे. अमेरिकेसोबत होणाऱ्या चर्चांवर याचा परिणाम झाला असून, काही नियोजित बैठकाही रद्द झाल्या आहेत. लष्करी नेतृत्वामुळे मुत्सद्देगिरीला फटका बसत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्तापालट झाल्याचे संकेत दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात सत्ता पूर्णपणे बदललेली नसून तिचे स्वरूप बदलले आहे. आता एकाच नेत्याऐवजी लष्करी गट अधिक प्रभावी झाला आहे. एकूणच, इराणमध्ये सध्या अस्थिरता नसली तरी नेतृत्वाच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. खामेनी यांच्या प्रकृतीमुळे देशातील सत्तेचे केंद्र हळूहळू लष्कराकडे झुकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
