नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणानंतर काही काळ राजकीयदृष्ट्या शांत असलेल्या रुपाली चाकणकर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. दीड महिन्यांच्या ब्रेकनंतर त्यांनी नाशिक जिल्ह्यातील नांदूर येथे कार्यकर्त्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली.
या बैठकीचे फोटो स्वतः रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर शेअर केले असून “गोतावळ” असे कॅप्शन दिले आहे. मात्र, या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पडद्यामागे काय घडतंय याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
खरात प्रकरणानंतर राजीनामा
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर चाकणकर यांचे त्याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आणि त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला होता.
चाकणकर यांनी आपला राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला होता. राजीनामा पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे स्वेच्छेने पद सोडत असल्याचे नमूद केले होते.
खरातच्या कार्यालयात सापडले महिलेच्या नावाचे चेक
भोंदू अशोक खरातच्या नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या ओकस प्रॉपर्टी या कार्यालयात झाडाझडती दरम्यान, SIT ला एका महिलेच्या नावाचा धनादेश व अंगठीचे माप घेण्यासाठीचे 13.0 ते 14.2 साइजचे 35 गोलाकार रिंग मेजरमेंटही सापडले. त्यामुळे याप्रकरणात आता तपासाला नवे वळण मिळाले आहे.
