पणजी : सनातन महासंघाचे संस्थापक गौतम खट्टर याला गोवापोलिसांनी अटक केल्याबद्दल ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी तीव्र टीका केली आहे.
या पार्श्वभूमीवर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याची अंमलबजावणी यावर पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे
सेंट फ्रान्सिस झेवियरबाबत केलेल्या गैरवक्तव्यामुळे खट्टर याला अटक करण्यात आली आहे. अटकेबद्दल धार्मिक क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, ‘इतिहासाबद्दल बोलणे हा गुन्हा ठरू नये, तसेच अशा वक्तव्यांमुळे एफआयआर दाखल करणे किंवा अटक करणे योग्य नव्हे’, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती सांगितले.
अपमानाचा हेतू नव्हता
शंकराचार्यांनी म्हटले की, ‘गोवापोलिसांनी खट्टर आणि त्यांच्या भावाला ताब्यात घेण्याची पद्धत योग्य नव्हती. खट्टर यांनी केलेले वक्तव्य हे फ्रान्सिस झेवियर यांच्या जीवनाशी संबंधित ऐतिहासिक संदर्भावर आधारित होते आणि त्यात थेट कोणताही अपमानाचा हेतू नव्हता.’
व्हीआयपी ट्रिटमेंट देणे थांबवा : प्रतिमा
पणजी : सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण करणाऱ्या गौतम खट्टर याला हिमाचल प्रदेश येथून अटक करून गोव्यात आणले. मात्र, त्याचे हावभाव पाहिले तर त्याला पोलिसांनी व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचे दिसून येते, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी केला आहे.
खट्टर याला पोलिसांनी कठोर शिक्षा करावी तसेच त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित मंत्री माविन गुदिन्हो व कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात एफआयआर नोंद करावी, अशी मागणी कुतिन्हो यांनी केली. त्या म्हणाल्या, की याबाबतची तक्रार आम्ही गोवा पोलिसांकडे दिली आहे. अन्य धर्माच्या लोकांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कुणालाच नाही.
