सोलापुरात बड्या नेत्यांसमोर फडणवीसांचा कुणाला इशारा.?
कुठल्याही परिस्थितीत पादर्शीपणे काम झाले पाहिजे. कुठलाही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. भ्रष्टाचार झाला तर एखाद्याला पदावरून काढावे लागले तर चालेल. काम करण्यासाठी लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे.
प्रत्येक गोष्टीत देवाभाऊ तुमच्या पाठिशी आहे. पण, चुकलात तर चुकीला माफी नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.
जिल्हा परिषद, महापालिका, नगपालिका, नगरपरिषद, पंचायत समितीच्या सदस्यांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार राम सातपुते, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपचे महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी सोलापूरच्या जनतेला हात जोडून नमन करेल की त्यांनी भाजपवर ऐतिहासिक असा विश्वास दाखवला आहे. सोलापूरकरांना सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या कर्जात आहोत. हे कर्ज आम्ही विकासाच्या माध्यमातून फेडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या प्रेमाच्या कर्जात जन्मभर राहू. पण, तुम्ही विकासासाठी जे कर्ज दिलंय, या पाच वर्षात प्रामाणित प्रयत्न करून शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीच्या आशा आणि आकांशा पूर्ण करण्याचे काम निश्चितपणे करणार आहोत.
२०१७ मध्ये ४९ नगरसेवक निवडून आले होते. २०२६ मध्ये १०२ जागा लढवून ८७ नगसरेवक निवडून आलेले आहेत. सोलापूरच्या इतिहासात हादेखील एक रेकॉर्ड आहे. अशाप्रकारचा स्ट्राइकरेट कुठल्याच पक्षाला मिळाला नाही. सगळे रेकॉर्ड आपण तोडलेले आहेत. जिल्हा परिषदेत २०१७ मध्ये १४ सदस्य होते. यंदा हनुमान उडी मारत थेट ३८ जागा निवडून आले आणि पूर्ण सत्ता आली. ११ पैकी १० सभापती आपले झाले. काँग्रेस आणि विरोधी पक्षाने देशातील संसदेत महिलांचे आरक्षण रोखले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं ५६ टक्के भगिनींना निवडून आणण्याचं काम केले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
विजयाचे पहिले शिल्पकार शहर आणि जिल्ह्यातील जनता आहे. दुसरे शिल्पकार भाजपचा सामान्य कार्यकर्ता आहे. तिसरे विजयाचे शिल्पकार निवडणुकीचे नेतृत्त्व करणारे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, देवेंद्र कोठे, राम सातपुते, राजेंद्र राऊत, शहर आणि जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी हा विजय खेचून आणला आहे. हा विजय विकासाचा आहे. हा विजय विकासावर ज्यांचा विश्वास आहे, त्यांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात होणाऱ्या परिवर्तनाचा विजय आहे, असे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
