शिंदेंच्या ऑफरवर बच्चू कडू स्पष्टच बोलले; वर्षात 40 ते 45 हजार कोटीचं…
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंना दिलेली विधान परिषदेची ऑफर त्यांनी अप्रत्यक्षपणे नाकारली आहे. आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, निव्वळ आमदाराकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही, असं म्हटलं आहे.
एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपण पूर्वी शिवसैनिकच होतो असंही आवर्जून नमूद केलं आहे. तसेच, बातमी तुमच्यापर्यंत (प्रसारमाध्यमांपर्यंत) आली म्हणजे ऑफरची शक्यता असू शकते पण आमच्यापर्यंत काहीही आलेलं नाही,” असं सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.
कामांचा पाढा वाचला
बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदेंचे आभार मानले. एकनाथ शिंदेंनी आपला विधान परिषदेसाठी विचार तरी केला याचं समाधन असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. पुढे बच्चू कडू यांनी त्यांच्या कार्यकाळात आणि खास करुन मागील एका वर्षात आमदार नसतानाही केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला. मी शेतकरी कर्जमाफीसाठी 350 सभा घेतल्या त्यानंतर कर्जमाफी झाली. दिव्यांगाची मदत 600 रुपयांवरुन अडीच हजारांवर पोहोचवली. मंत्रीपदापेक्षाही चळवळ महत्त्वाची 182 शासन निर्णय काढले. भूमिहीन लोकांसाठी, शेतमजुरांसाठी अपघात विमा लागू केला. घरकुलांसाठी शिंदेंच्या मदतीने 50 हजार रुपये आले, असं बच्चू कडू म्हणाले.
40 ते 45 हजार कोटीचं बजेट…
एका वर्षात 40 ते 45 हजार कोटीचं बजेट शेतकरी मजुरांसाठी वळवावं लागलं. मला असं समजलं की बच्चू कडू यांची वर्णी लागणार आणि ते विधान परिषदेचे आमदार होणार. मी एक कार्यकर्ता आहे. शिंदेंनी असा निर्णय घेतला तर दिव्यांगाचं आणि शेतकऱ्याचं भलं होईल. आमचा विचार झाला तर आमचे काही मुद्दे आहेत. दिव्यांगांचे उर्वरित प्रश्नांची पुर्तता झाली पाहिजे. कर्जमाफी, पगार वाढ आहे. हमीभावाचा मुद्दा आहे. आमचाही प्रस्ताव आहे. आम्ही पदासोबत युती करणारे आम्ही नाहीत. निवडणुका आल्यावर इतर पक्षांच्या युती होतात. मुद्दे असतील तर आम्ही पुढे पाऊल टाकू. संत्रे उत्पादक, कांदा उत्पादक, ऊस उत्पादक, विधवा भगिनींसंदर्भातील मुद्दे आहेत. यावर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असं बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू हा एकमेव असा नेता आहे जो…
निव्वळ आमदाराकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही. यावर चर्चा होईल. प्रहार 1 लाख सभासद असणारी संघटना आहे. दिव्यांग 5 ते 10 लाख लोक जोडलेले आहेत. तुम्हाला ते विदर्भापुरतं असेल, बच्चू कडू अमरावतीपुरता आहे पण असं नाहीये. प्रहार शिक्षक, प्रहार कामगार संघटना, प्रहार दिव्यांग संघटना आहे. ती कार्यकर्त्यांची संघटना आहे. कार्यकर्त्यांच्या कष्टातून, घामातून तयार झालेली संघटना आहे. जेव्हा विलिनीकरणाच्या बातम्या वाचत होतो तेव्हा वाईट वाटत होतं. मी जुना शिवसैनिकच होतो. शिवसेनेच्या बंडखोरीतून प्रहार! बच्चू कडू हा एकमेव असा नेता आहे जो शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही पक्षात गेला नाही, असंही बच्चू कडू म्हणाले.
