संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख विजयी झाले असून त्यांनी मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव केला आहे.
आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळल्यानंतर स्वरुपानंद देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गावकऱ्यांनी दाखवलेला विश्वास संतोष देशमुख हत्या प्रकरणात मिळेपर्यंत गावकरी सोबत लढणार आहोत तसेच हा विजय संतोष देशमुख यांना समर्पित असल्यास स्वरूपानंद देशमुख यांनी सांगितलं.
स्वरूपानंद देशमुख यांनी गावाच्या विकासावर तर मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या नावावर मते मागितली होती. यात अखेर गावकऱ्यांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला . तब्बल ९२ मतांनी स्वरूपानंद देशममुख विजयी झाले आहेत.
विजयानंतर स्वरुपानंद देशमुख काय म्हणाले?
विजयानंतर ‘न्यूज १८ मराठी’ सोबत बोलताना स्वरुपानंद देशमुख यांनी म्हटले की, या निवडणुकीत पैशांचा आणि राजकीय दबाव होता. मात्र, त्याला न जुमानता माझ्या बाजूने मतदान झालं. संतोष अण्णा किंवा अश्विनीताईंसोबत कोणतंही भांडण नव्हतं. मात्र, गावातील काही टोळक्यांनी ही निवडणूक लादली. माझ्याविरोधात मोठा अपप्रचार झाला. त्यावर बोलताना मी आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. आरोप होत असताना गावातील बहाद्दूर मतदारांनी अपप्रचारावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी माझ्या बाजूने मतदान केले असल्याचे स्वरुपानंद देशमुख यांनी म्हटले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आम्ही अश्विनीताईंसोबत भक्कमपणे उभे आहोत. त्यांना न्यायालयीन लढाईत पूर्ण साथ देणार असल्याचेही स्वरुपानंद देशमुखांनी म्हटले.
मागच्यावेळी ९ मतांनी पराभव, आता विजय
स्वरूपानंद देशमुख यांनी मागच्या वेळी देखील सरपंच पदाची निवडणूक लढविली होती. त्यावेळी संतोष देशमुख यांनी त्यांचा अवघ्या ९ मतांनी पराभव केला होता. आता मयत संतोष देशमुख यांच्या पत्नीच्या विरोधात तेच स्वरूपानंद देशमुख ९२ मतांनी निवडून आले आहेत.
