आसामच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; 4 आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ !
आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मोठ्या विजयानंतर आज मंगळवारी (१२ मे) हिमंता बिस्वा सरमा यांनी दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासह आसाममध्ये सलग दोनवेळा मुख्यमंत्री बनणारे ते पहिले बिगर-काँग्रेसी नेते ठरले आहेत.
गुवाहाटी येथे आयोजित भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना शपथ दिली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपशासित अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
आसाममध्ये एनडीए सरकारची ही सलग तिसरी टर्म आहे. यापूर्वी २०१६ मध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा सर्वानंद सोनोवाल मुख्यमंत्री झाले होते, तर २०२१ मध्ये हिमंता बिस्वा सरमा यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली होती. हा शपथविधी सोहळा अत्यंत खास मानला गेला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याशिवाय एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते.
‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
रामेश्वर तेली
अतुल बोरा
चरण बोरो (बीपीएफ)
अजंता नियोग
हिमंता बिस्वा सरमा यांचा राजकीय प्रवास
हिमंता बिस्वा सरमा २०१५ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी आसाममध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते आणि भाजपकडे केवळ पाच आमदार होते, परंतु हिमंता सरमा यांनी ईशान्य भारतात भाजपला मजबूत करण्यासाठी धोरणात्मकरीत्या काम केले. २०१६ मध्ये भाजपने त्यांना ‘नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्स’ (NEDA) चे निमंत्रक बनवले. त्यानंतर त्यांनी ईशान्येतील प्रादेशिक पक्षांना भाजपसोबत जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ईशान्य भारतात भाजपचा वेगाने वाढणारा प्रभाव यामागे हिमंता बिस्वा सरमा यांची रणनीती हे सर्वात मोठे कारण आहे. सरमा यांचे शिक्षण गुवाहाटीमध्येच झाले. त्यांनी शालेय शिक्षण कामरूप अकादमीतून पूर्ण केले. त्यानंतर कॉटन कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयात बी.ए. आणि एम.ए.ची पदवी घेतली. पुढे गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून एलएलबी पूर्ण करून काही काळ गुवाहाटी उच्च न्यायालयात वकिलीही केली.
विद्यार्थी राजकारणातून सुरुवात
साल २००६ मध्ये त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी राजकारणातून झाली. १९९१-९२ मध्ये ते कॉटन कॉलेज विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस होते आणि नंतर ‘ऑल आसाम स्टुडंट्स युनियन’ (AASU) शी जोडले गेले. १९९० च्या दशकात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि २००१ मध्ये जालुकबारी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. विशेष बाब म्हणजे, ते या जागेवरून आतापर्यंत सलग निवडून येत आहेत.
खानापारा येथे भव्य सोहळा
गुवाहाटीच्या खानापारा येथे शपथविधी मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. भाजपचे पंचायत अध्यक्ष आणि सदस्यांसह एक लाखांहून अधिक लोक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. सुरक्षेच्या कारणास्तव, संपूर्ण गुवाहाटीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, केंद्रीय आणि राज्य पोलीस दल प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
