पायाभूत सुविधा, नाविण्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण,तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे.या सर्व शक्तींचा सहयोग साधणाऱ्या अर्थव्यवस्था भविष्याचे नेतृत्व करणार असल्याने ही क्षमता असणारा महाराष्ट्र त्यादृष्टीने आवश्यक इकोसिस्टीम उभारत आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवेने प्रयत्न सुरु असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. संतुलित प्रादेशिक विकास हा केवळ सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर तो आर्थिकदृष्ट्याही अत्यंत शहाणपणाचा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नवी दिल्ली येथील हॉटेल ताज पॅलेसमध्ये कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीतर्फे (सीआयआय) आजपासून आयोजित ॲन्युअल बिझनेस समिट – 2026 या दोन दिवसीय परिषदेअंतर्गत सोमवारी सकाळच्या सत्रात झालेल्या ‘व्हिजन फॉर इंडिया@100’ परिसंवादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे डायरेक्टर जनरल चंद्रदीप बॅनर्जी आणि अध्यक्ष राजीव मेमाणी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, आजचे जग एकाच वेळी अनेक स्थित्यंतरातून जात आहे. यात भू-राजकीय विखंडन, तांत्रिक उलथापालथ, ऊर्जा संक्रमण, पुरवठा साखळीतील बदल आणि आर्थिक विकासाच्या भविष्याबद्दलची मोठी अनिश्चितता यांचा समावेश आहे. मात्र, या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारत हा एकमेव देश मोठ्या प्रमाणावर जगाचा आत्मविश्वास वाढवत आहे.
त्याचे कारण केवळ आमची बाजारपेठ अथवा तरुण लोकसंख्या नाही तर आमच्याकडे स्थैर्य, महत्त्वाकांक्षा, लवचिकता आणि अंमलबजावणी करण्याची जबरदस्त क्षमता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या दशकात स्वतःबद्दल जागतिक स्तरावर नवी प्रतिमा स्थापित केली आहे.आता आमच्याकडे क्षमतेसोबतच संधी आणि धोरणांची वेगाने अमंलबजावणी करणारा देश म्हणून पाहिले जात आहे. मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. दशकानुदशके महाराष्ट्र हे भारताचे ‘इकोनॉमिक इंजिन’ राहिले आहे. पण आता आम्ही त्याहूनही मोठ्या ध्येयासाठी स्वतःला तयार करत आहोत. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी आम्ही महाराष्ट्राला सज्ज करत आहोत.
महाराष्ट्र ६६० अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे. भारताच्या जीडीपीत सुमारे १५ टक्के योगदान देते. ४० टक्के थेट परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्राला २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत जगातील सर्वात महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्था बनविण्याची आमची योजना आहे. यंदा दावोसमध्ये महाराष्ट्राने जवळपास ३० लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव आणले. अनिश्चिततेच्या जगात विश्वास हीच खरी आर्थिक पुंजी असते आणि महाराष्ट्राने हा विश्वास निर्माण केला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
