
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- पुण्यातील अरण्येश्वर परिसरातील गवळीवाडा परिसरात राहणाऱ्या एका मुलीनं सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत मोठं यश मिळवलं आहे. घरची परिस्थिती बेताची, कोणाचा आर्थिक आधार नाही असे असतानाही पहिल्याच प्रयत्नात तरुणीनं ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. धनश्री संजय हिरणवाळे असं संबंधित तरुणीचं नाव आहे. तिची आई परिसरात घरकाम करते. तर वडीलही एका छोट्या कंपनीत तुटपुंज्या पगारावर नोकरी करतात. परिस्थितीपुढे हार न मानता धनश्रीने पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षा उत्तीर्ण केल्यानं सर्व स्तरातून धनश्रीचं कौतुक केलं जात आहे. खरंतर, दहावीची परीक्षा पास झाल्यानंतरच धनश्रीनं सीए होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. पण घरची परिस्थिती बेताची होती. महागडे क्लास लावणं परवडणारं नव्हतं. शिवाय मार्गदर्शन करायलाही कोणीही नव्हतं. सोबतीला होती फक्त जिद्द आणि चिकाटी.पोरीच्या या जिद्दीपुढे तिच्या परिस्थितीने देखील हात टेकले आहे. तिने केवळ इच्छाशक्ती आणि अथक प्रयत्नाच्या जोरावर सीए परीक्षेत यश मिळविले.