
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर
: शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रिंगरोडसाठी दीड हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रिंगरोडच्या कामास गती मिळाली आहे. हा रिंगरोड भोर, हवेली, मुळशी आणि मावळ या चार तालुक्यांतील 37 गावांमधून जाणार आहे. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी प्राथमिक दर निश्चित करण्याचे काम सुरू आहे. यापैकी 18 गावांमधील दर निश्चित झाले असून दर निश्चित करणाऱ्या समितीने त्यास मान्यता मिळाल्यानंतर अंतिम दर सर्व्हे नंबरनिहाय जाहीर केले जाणार आहेत. दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर भूसंपादन करणार असून स्वेच्छेने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना पाचपट मोबदला मिळणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम “एमएसआरडीसी’ने हाती घेतले आहे. या रिंगरोडचे पूर्व व पश्चिम असे दोन टप्पे आहेत. पूर्व रिंगरोड उर्से (ता. मावळ)- केळवडे (ता.भोर) असा आहे. तर पश्चिम रिंगरोडला केळवडेपासून सुरुवात होणार असून हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका हा रिंगरोड सुमारे 68 किलोमीटर लांबीचा असणार आहे.