
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर.
पुणे: आज मराठा क्रांती मोर्चाच्या तर्फे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यासमोर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध व घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सदावर्ते यांची पोलीस ठाण्यातून रवानगी करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलिसांनी ॲड. सदावर्ते यांच्या आवाजाचा नमूना गुरुवारी रेकॉर्ड केला. त्यांच्यावर २०२० मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी जबाब घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
मुंबईतील शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. त्यानंतर लगेचच सातारा पोलिसांनी एका गुन्ह्यात त्यांचा ताबा घेतल्यानंतर आता पुण्यात सदावर्तेंवर दाखल असलेला गुन्हा समोर आला.
दरम्यान, या गुन्ह्यात पहिला जबाब भारती विद्यापीठ पोलिसांनी बुधवारी नोंदवला. यानंतर गुरुवारी त्यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.