
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
१० मे पर्यंत घेता येणार प्रवेश आतापर्यंत २८ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित
आर टी ई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी ची तारीख वाढवून १० मे करण्यात आली आहे.ही प्रवेश घेण्यासाठी अंतिम मुदतवाढ असल्याचे जिल्हा शिक्षण विभागाने कळविले आहे.—पुंडलिक चौधरी,प्रभारी गटशिक्षणाधिकारी,जव्हार पंचायत समिती
जव्हार: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियमानुसार,ऑनलाइन लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या मुलांचे प्रवेश २० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या.त्यांनतर ही प्रवेश प्रक्रिया २९ एप्रिल पर्यंत होणार होती परंतु पुन्हा एकदा ही मुदतवाढ करण्यात आली असून १० मे पर्यंत वेळ मिळाला असल्याने,पालकांना व विध्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.ऑनलाइन प्रक्रियेतील तांत्रिक समस्यांमुळे मोठी गैरसोय सहन करावी लागत होती.
जव्हार तालुक्यातील ३ शाळांमधून ४० विध्यार्थ्यांना आर टी ई अंतर्गत मोफत शिक्षण मिळणार होता.त्याबाबतची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती ४० पैकी २८ विद्यार्थ्यांनी आरटीई अंतर्गत आपला प्रवेश निश्चित केला आहे.अजूनही १२ जागा शिल्लक असल्याने प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेश मिळेल की या जागा रिक्त राहतील हा प्रश्नच आहे.नेटवर्क समस्या,प्रवेश घेतेवेळी लागणारी कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याने विध्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी जव्हार तालुक्यातील ३ शाळांमध्ये ४० मुला-मुलींना प्रवेश देण्यात येणार आहेत. ४० जागांसाठी तब्बल ७७ अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारे दाखल करण्यात आले होते.दाखल अर्जाची छाननी करून ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली होती. लॉटरी पद्धतीतून ४० जणांची निवड करण्यात आली होती.त्यापैकी २८ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत लॉटरी पद्धतीने मुलांची निवड करण्यात आली असून २८ विद्यार्थी व पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण केली.