
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -राहुल रोडे
उदगीर :- जिवंत असलेल्या व्यक्तीस मयत दाखवण्यास मदत करण्यासाठी खोटे मृत्यू प्रमाणपत्र देणारी उदगीरची ती नगरसेविका रेखा आपटे व तिचा पती ज्ञानेश्वर आपटे यांना गुन्हा नोंद झाल्यापासून तीन महिन्यानंतर पोलिसांनी अटक करून गजाआड केले आहे.
उदगीर येथील परमेश्वर केंद्रे वय वर्षे ४३ हे जिवंत असतानाही उदगीर शहरातील काही भामट्यांनी परमेश्वर केंद्रे यांच्या पत्नी राजेश्री हिच्या मदतीने परमेश्वर केंद्रे जीवंत असताना ही त्यांचे मयत प्रमाणपत्र काढून केंद्रे यांची प्राॅपर्टी हाडप करण्याचा प्रयत्न केला होता. यापैकी नगरसेविका रेखा आपटे तसेच त्यांचा पती ज्ञानेश्वर आपटे यांना तीन महिन्यानंतर अटक करण्यात उदगीर पोलिसांना यश आले आहे.
परमेश्वर केंद्रे हे मुंबई येथे एका खाजगी कंपनीत काम करतात. त्यांच्या परिवारातील आई, वडील, लहान भाऊ यांचा मृत्यू झाला आहे. लाॅकडाऊनच्या काळात परमेश्वर केंद्रे यांना बराच काळ गावी येता आले नाही. याचा फायदा केंद्रे यांच्या पत्नी राजश्री हिने उधिर्न येथील नगरसेविका रेखा आपटे, नगरसेविकेचा पती ज्ञानेश्र्वर आपटे तसेच अन्य सहा व्यक्तीना सोबत घेऊन जीवंत असतानाही परमेश्वर केंद्रे यांचे मृत्यू प्रमाणपत्र काढून प्रापर्टी हडप करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः उदगीर न्यायालयाच्याही डोळ्यात धुळफेक करून खोटे मृत्यू प्रमाणपत्र मिळवले.
परमेश्वर केंद्रे यांची आई आणि भाऊ यांचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नसून त्यांचाही घातपात झाला असुन या वरील मंडळी ला सोबत घेऊन पत्नी राजश्री हीने घातपात केल्याचा संशय परमेश्वर केंद्रे यांनी व्यक्त केला आहे. तसेच याचाही तपास उदगीर पोलिसांनी करावा अशी मागणी सुध्दा परमेश्वर केंद्रे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
परमेश्वर केंद्रे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्यांची पत्नी राजश्री केंद्रे व तिला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात उदगीर शहर पोलीसात गुन्हा नोंद केला होता.
तीन महीन्या नंतर उदगीर पोलीसांनी दोघांना अटक केली असून नगरसेविका रेखा आपटे आणि त्यांचे पती ज्ञानेश्वर आपटे या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस कस्टडी घेतली होती. आता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक एडके यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सौ. राजेश्री केंद्रे यांच्या सह पाच जन अजूनही फरार आहेत.