
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर.
पुणे : पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या महिन्यापासून बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज आली आहे. अमेरिकेहून खास मागविलेल्या इंजेक्शनमुळे कार्यकर्त्यांचे “भाऊ” आमदार जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. आता ते खुर्चीत बसू व काही पावले चालूही शकतात.
प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याने आमदार जगतापांना आठवड्याभरात रुग्णालयातून घरी सोडले जाऊ शकते, असे तत्यांचे बंधू शंकर जगताप यांनी पत्रकारांना सांगितले. तर, जगताप आता लिक्वीड डायट घेऊ लागले आहेत, असे त्यांचे दुसरे बंधू विजय जगताप म्हणाले. अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे बंधूंच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. कालच जगतापांना या इंजेक्शनचा आणखी एक डोस देण्यात आला. १२ एप्रिल पासून रुग्णालयात दाखल आहेत. वीस एप्रिलला त्यांचा व्हेंटीलेटर काढल्याने त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला होता. तर, आता ते बेडवरून उठून खुर्चीत बसू लागल्याने तसेच काही पावले चालूही लागल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याची खुषखबर त्यांचे बंधू शंकर जगताप यांनी आज (ता.१०) भाजपा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या कोथरुड येथील निवासस्थानी जाऊन दिली.