
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर
पुणे : हजारो कोटींच्या बहुचर्चित मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजनेबाबत पर्यावरण अभ्यासकांनी आक्षेप उपस्थित केल्याने राज्य शासनाने योजनेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र त्यानंतरही योजनेची कामे रेटण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. राज्य शासनाने तोंडी आदेश दिल्याने कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून संबंधित ठेकेदारांकडून नदीकाठ सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
साबरमती नदीच्या धर्तीवर मुळा-मुठा नदीकाठाचे पुनरूज्जीवन आणि सुशोभीकरण करण्याचे नियोजित आहे. त्याअंतर्गत एकूण ४४ किलोमीटर लांबीचा नदीकाठ सुशोभीत होणार आहे. नदीचे खोलीकरण, नदीकाठी उद्याने, छोटी मैदाने, जॉगींग ट्रॅक, सायकल मार्ग, विरंगुळा केंद्र अशी कामे याअंतर्गत प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते बंडगार्डन या दरम्यानच्या नदीकाठाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात बंडगार्डन ते मुंढवा हा सात किलोमीटर लांबीचा नदीकाठ सार्वजनिक खासगी लोकसहभागातून विकसित केला जाईल. ह्या कामांना पर्यावरणवादी लोकांचा विरोध आहे.