
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत दरमहा १०० रुपयांचे योगदान
आ. चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील एक हजार मुलींचे पालकत्व घेत, ‘सुकन्या समृद्धी योजने’अंतर्गत दरमहा शंभर रुपये योगदान देणार असल्याची घोषणा केली. आ. पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघातील नागरिकांसाठी ‘आमदार जनसंवाद’ उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत वस्ती आणि सोसायटी मधील नागरिकांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत.
आज कोथरुड मतदारसंघातील सागर कॉलनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या मुलींना योजनेचे पासबुक वाटप केले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दिलीप वेडे-पाटील, नगरसेविका अल्पना वर्पे, श्रद्धा प्रभुणे-पाठक, स्विकृत सदस्य बाळासाहेब टेमकर, प्रभाग १० अध्यक्ष कैलास मोहोळ, सरचिटणीस सौ. महाजन, स्विकृत सदस्या मिताली सावळेकर, वैभव मुरकुटे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव गणेश वर्पे, भाजपा नेते नवनाथ जाधव, दीपक पवार, पल्लवी गाडगीळ, रुपेश भोसले, प्रदीप जोरी, सचिन पवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित.
आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी लोकहितार्थ निर्णय घेऊन, अनेक योजना राबविल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींचे शिक्षण आणि पुढील जीवनमान सुसह्य व्हावे; यासाठी ‘सुकन्या समृद्धी योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत १० वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या मुलीच्या नावे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसात खाते उघडण्यात येत आहे. खाते उघडल्यानंतर २१ वर्षापर्यंत किंवा मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न करावयाचे असल्यास व्याजासह ठेव परत मिळते.
आ.पाटील पुढे म्हणाले की, सध्या माझ्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत कोथरूड मतदारसंघातील मुलींची नोंदणी सुरू असून, मुलींचे खाते उघडण्यासाठी २५० रुपये ही भरले जात आहेत. त्याचा पुढचा भाग म्हणून या योजनेत मुलीचे नाव नोंदणी झालेल्या कुटुंबाने दरमहा किमान १०० रुपये द्यावेत. अतिरिक्त १०० रुपये लोकसहभागातून देऊन किमान १००० मुलींचे पालकत्व घेत; त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावू. यामुळे प्रत्येकी २०० रुपये भरल्याने २१ व्या वर्षी व्याजासह त्या मुलींना एक लाख दोन हजार ७६ रुपये मिळतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.