
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
मोखाडा: तालुक्या पासून 35 ते40 किमी अंतरावर दरी डोंगरात वसलेल्या,व सोयीसुविधा पासून वंचित असलेल्या मुकुंद पाड्यातील दुर्गा मनोहर भोये या 20 वर्षीय गरोदर मातेला रस्त्या अभावी 4 किमीचा डोंगर डोलीतून पार करावा लागल्याची धक्कादायक घटना काही दिवसापूर्वी घडली आहे , या घटनेचे लोकमतने मुख्य अंकात पहिल्या पानावर वृत्त प्रसिद्ध करून हे भयाण वास्तव चव्हाट्यावर आणले यामुळे येथील रस्ताचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला असून लोकमतने वृत्त प्रसिध्द केल्या नंतर याची दखल खासदार राजेंद्र गावित यांनी घेतली असून केंद्रातून येथील रस्त्यासाठी व तसेच पुलासाठी निधी मंजूर करून येथील हा ज्वलंत प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू असे अश्वासन खासदार राजेंद्र गावितयांनी लोकमतशी बोलताना दिले
“आमच्याकडे रस्त्याची सोय नाही. आजारी पेशंट झाल्यास लाकडाची डोली करून 8 किमीचा डोंगर पार करून दवाखाना गाठावा लागतो. सिरीयस पेशंट रस्त्यातच दगावतात. पावसाळ्यात आमची समस्या अधिकच बिकट बनते. तालुक्याशी संपर्क तुटून जातो, रेशन आणायला आम्हाला नदीतून जीवाची बाजी लावून नदी पार करावी लागते,” असे येथील स्थानिक आदिवासी गणपत पांडू भोये यांनी सांगितले. तसेच येथे वीज, सोडली तर कोणत्याच सुविधा नाहीत. पाणी, रस्ता, आरोग्य अशा कोणत्याच सुविधा नाहीत. गावातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर लाकडाची डोली करून त्या रुग्णाला न्यावे लागते. वेळेत उपचार न मिळल्याने पेशंट रस्त्यातच दगावतो, असे इथले लोक सांगतात. पावसाळयात तर या पाड्याचा संपर्कच तालुक्याशी राहत नाही. केंद्र सरकार म्हणतंय मेक इन इंडिया, डिजिल इंडिया, या योजना कुठे आहेत, असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे.
स्वस्त धान्यासाठी ८ किमी पायपीट
128 आदिवासी लोकवस्तीच्या मुकुंदपाड्यावर सोयीसुविधांचा अभाव आहे. येथे मिनी अंगणवाडी आहे परंतु ती बंदच असते. शाळाही गेल्या पाच सहा वर्षांपासून बंद आहेत. पाण्याची सोय नाही त्यामुळे बारमाही नदीवरून खड्डा खोदून पाणी आणावे लागते. एवढंच काय रेशन दुकानावरचे धान्य आणण्यासाठी 8 किलोमीटरचा भला मोठा डोंगर पार करून त्यांना चिकाडीचा पाडा गाठावा लागतो. बरं एकाच फेरीत रेशन मिळेल याची शाश्वती नसते. यामुळे एका महिन्याचे धान्य आणण्यासाठी 4 ते 5 वेळा फेऱ्या माराव्या लागतात. पावसाळयात नदीच्या पलीकडे ये-जा करावी लागत असल्याने जीवघेणी कसरत करावी लागते शाळकरी विद्यार्थ्यांना नदीत पोहुन शाळा गाठावी लागते तर चार महिने रेशन आणण्यासाठी नदीच्या प्रवातून धान्य प्लास्टिकच्या पिशवीत बांधून मोठ्या शितापीने नदी पार करावी लागते.
7 ते 8 किमीचा डोंगर पार करण्याची कसरत
एखादी व्यक्ती आजारी पडल्यास येथील आदिवासींना लाकडाची डोली करून 7 ते 8 किमीचा डोंगर पार करून ओसरविरा येथील उपकेंद्र गाठावे लागते. इथे उपचार न झाल्यास किंवा पेशंट सिरीयस असल्यास पुढील उपचारासाठी 18 किमी अंतरावर मोखाडा ग्रामीण रुग्णालयात गाठावे लागते, यामुळे जीव मुठीत धरून मरण यातना भोगणाऱ्या या आदिवासींकडे प्रशासन लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार हा प्रश्न आहे.