
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी- आपसिंग पाडवी
कच्च्या कैऱ्या पासून तयार केलेली आमसूल दिल्ली, जयपूर रवाना…
यंदा दर चांगला मिळत असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध…
आमसूल प्रक्रिया उद्योगाच्या योजना मात्र कागदावरच…
यंदा आवक कमी मात्र दर प्रति किलो दर २८०
ता. १६ नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा अतिदुर्गम भागातील धडगाव, मोलगी, अक्कलकुवा, तोरणमाळ परिसरात आदिवासी बांधवांकडून शेतीसोबत आंब्याच्या झाडांची लागवड करून उन्हाळ्यात आंब्याच्या कच्च्या कैऱ्यापासून आमसूल तयार करून विक्री करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असते. यातून आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होतो. शहरातील सोमवारच्या आठवडी बाजारात आदिवासी बांधव आमसूल विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दाखल होतात
गेल्या दोन वर्षात आमसूल तयार करून विक्री ची प्रक्रिया काही अंशी मंदावली होती; परंतु यंदा गेल्या दोन वर्षाचे नुकसान भरून निघेल असा चांगला दर मिळत असल्याने सातपुड्यात आदिवासी बांधवांकडून कच्च्या कैऱ्यापासून आमसूल तयार करण्याची लगबग सुरू आहे. कच्च्या कैर्या पासून आंबा सोलून बारीक तुकडे करून उन्हामध्ये वाळवून विक्रीसाठी आणलेल्या आमसूल ला 160 रुपये ते 200 रुपये पर्यंत प्रति किलो दर मिळत आहे.
सातपुड्यातील आमसुल खरेदी स्थानिक व्यापारी तसेच इंदोर, जयपुर व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जात आहे. धडगाव येथे खरेदी केलेले आमसूल दिल्ली, जयपूर, उत्तर प्रदेश या ठिकाणी निर्यात केले जाते. सातपुड्यातील आमसूल ला उत्तर भारतात मोठी मागणी असून आमसूल पासून विविध मसाल्याचे पदार्थ औषधे बनवले जातात. यंदा उशिराने सुरू झालेला आमसूल चा व्यवसाय आणखी 15 ते 20 दिवस सुरू राहणार आहे.
सातपुड्यातील आदिवासी बांधवांना आणखी चांगला दर मिळावा यासाठी गेल्यावर्षी अक्राणीचे आमदार तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी आमसूल साठी प्रक्रिया उद्योग उभारणार असल्याची घोषणा केली होती; परंतु अद्याप कोणताही प्रक्रिया उद्योग अर्थात पावडर बनवण्याचा कारखाना तयार झालेला नाही. याबाबत स्थानिक नागरिकांना माहिती देऊन लवकर प्रक्रिया उद्योग उभारावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.