
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई | डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ रूग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात अनेक दिग्गज राजकारण्यांनी हजेरी लावली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व भाजप नेत्या पंकजा मुंडे हे बहिण भाऊ देखील उपस्थित होते.
बहिण-भावाच्या या जोडीने एकमेकांबद्दल केलेली वक्तव्ये व शाब्दिक कोट्यांनी सर्वांचंच लक्ष वेधलं. या कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना उद्देशून केलेल्या वक्तव्याची सध्या सगळीकडेच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
आमचं बहिण-भावांचं राजकीय वैर जगाला माहिती आहे. पण काही व्यक्तींसमोर आमचं वैर काहीही नाही. ती व्यक्ती त्यावेळी आमच्यासाठी महत्त्वाची असते. त्यामुळे कदाचित पंकजा ताईंनी लेन्सेस बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लेन्सेस लावल्या तर बरं राहील, असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं आहे.
दरम्यान, धनंजय मुंडेंचं हे वक्तव्य म्हणजे पंकजा मुंडेंना महाविकास आघाडीत यायची ऑफर तर नाही ना, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तर या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या डोक्यावर मायेची टपली देखील मारली. बहिण भावंडांचा हा व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.