दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
महापालिका व महावितरण विभागाला दिले पत्र
नांदेड – महापालिका व महावितरण विभागाला मान्सूनपूर्व कामे करून घेण्याबाबत नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी पत्र दिले आहे. काल झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी ड्रनेज व नालीचे पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याचे दिसुन आले तर विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता.
यावर्षी लवकरच राज्यात मान्सून दाखल होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. दि. 19 रोजी सकाळच्या सुमारास अचानक पणे अर्धा तास पाऊस शहरात पडला. यावेळी अनेक ठिकाणी ड्रेनेज व नाल्याचे पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याचे पाहावयास मिळाले आहे. तसेच अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा देखील खंडित झाल्याचे समोर आले आहे. यामुळे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ मान्सून पूर्व ड्रेनेज व नालेसफाई करून घेणे गरजेचे आहे. अध्याप शहरातील नालेसफाई झाली नाही, त्यामुळेच अर्धा तास पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी आले. तसेच महावितरण विभागाकडून देखील अद्याप विद्युत तारांना स्पर्श झालेल्या झाडांच्या फांद्या, अडथळे दूर करण्यात आले नसल्यामुळे विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. ही बाब नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी दोन्ही विभागांना पत्र देऊन कळविली आहे. तात्काळ दोन्ही विभागांनी मान्सूनपूर्व कामे करून घ्यावेत, अन्यथा होणाऱ्या दिरंगाईस संबंधित प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा देखील उल्लेख आ. बालाजी कल्याणकर यांनी संबंधित पत्रात केला आहे.
