
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा -गुणाजी मोरे
पुणे मेट्रो मार्गात व्यत्यय आल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्यात आला होता. मात्र अजूनही या पुलाचं काम ठप्प असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) (pune)प्रस्तावित मेट्रो मार्गात व्यत्यय आल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्यात आला होता. मात्र, आठ महिने उलटूनही उड्डाणपुलाचे काम सुरू होऊ शकले नसल्याचं चित्र आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी पालिकेने छोटी-मोठी पस्तीस कामे तातडीने करावीत. हे काम झाल्यानंतरच उड्डाणपुलाचे काम सुरू होईल, अशी भूमिका पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतली आहे. महापालिकेकडून काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याने उड्डाणपुलाचे काम कधी सुरू होणार?, असा सवाल वाहनचालक करत आहेत.
पीएमआरडीएच्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गातील अडथळे असलेले पूल मेट्रोच्या उड्डाणपुलाला अडथळा ठरत असल्याने ते पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनच्या काळात ४५ कोटी रुपये खर्चून बांधलेला उड्डाणपूल पाडण्यात आला. उड्डाणपूल पाडल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी संयुक्त बैठकीत नियोजन करण्यात आले. मात्र उड्डाणपुलाचे काम सुरू न झाल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.