
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. यातच रशिया-युक्रेन युद्धानं पाकिस्तानसाठी आणखी संकटं निर्माण झाली आहेत.
पाकिस्तानात गहूचा तुटवडा निर्माण झाला आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादल्यामुळे पाकिस्तानला इच्छा असूनही रशियाकडून तेल आणि गहू आयात करता येत नाहीय. पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांमुळे आम्हाला रशियाकडून इंधन आणि गहू आयात करणं आता मुश्किल झालं आहे, असं पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी मंगळवारी म्हटलं. रशियाकडून गहू आयात करण्यासाठी पाकिस्ताननं युद्धाच्या आधीच मागणी केली होती. पण त्यावर अजूनही रशियाकडून उत्तर आलेलं नाही, असंही ते म्हणाले.
“रशियानं इंधन खरेदीसाठीचा कोणताही प्रस्ताव पाकिस्तानला दिलेला नाही. त्यामुळे आम्हाला रशियाकडून इंधन खरेदीचा विचार करणं देखील आता कठिण होऊन बसलं आहे”, असं सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह म्हणाले. पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारनं रशियन सरकारकडे गहू खरेदीची मागणी केली होती. पाकिस्तानच्या नव्या सरकारनंही रशिया आणि युक्रेन अशा दोन्ही देशांकडे गहू आयातीची मागणी केली आहे. पण त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दोन्ही देशांनी दिलेली नाही.