
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
प्राप्तीकर कार्यालयातर्फे अमरावतीत सोमवारी सीए भवनात कार्यक्रम
अमरावती :- प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमात आयकॉनिक वीक समारंभाचे उद्घाटन सोमवारी (६ जून) नवी दिल्लीत विज्ञानभवनात होईल.त्यानिमित्त यादिवशी प्रधान मुख्य प्राप्तीकर आयुक्त कार्यालयातर्फे अमरावती येथील सातुर्णा औद्योगिक वसाहत परिसरातील सीएभवनात सकाळी १० वाजता विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती प्राप्तीकर उपायुक्त प्रमोद शाहाकार यांनी दिली.
दिल्लीत प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभाचे थेट प्रसारण देशातील ७५ प्रमुख शहरांत होणार असून,त्यात अमरावतीचा समावेश आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालय व कॉर्पोरेट कार्य मंत्रालयांतर्गत विविध प्रशासकीय सुधारणा,त्याची देशाच्या आर्थिक विकासातील भूमिका यांचे दर्शन या कार्यक्रमात घडेल.यावेळी डिजीटल प्रदर्शनाचा शुभारंभ व विविध मूल्यांच्या पाच नाण्यांच्या विशेष आवृत्तीचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होणार आहे.नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी सहाय्यकारी ठरणाऱ्या जन-समर्थ पोर्टलचा शुभारंभ यावेळी होईल.‘मनी फ्लोज, नेशन ग्रोज’ हा लघुपटही यावेळी दाखवला जाईल.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ,केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ,वित्तीय सेवा विभाग,महालेखानियंत्रक,अरूण जेटली राष्ट्रीय वित्तीय प्रबंधन संस्था,अर्थ मंत्रालय,कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या विविध विभागांद्वारे ६ ते ११ जूनदरम्यान अनेक कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत.
देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि येथील संस्कृतीचा,महापुरूषांच्या कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे असे श्री.शाहाकार यांनी सांगितले.