
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
कृषी दुकानावर कार्यवाही करून विक्री परवाने रद्द करा
लोहा : – लोहा तालुक्यात कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असुन खत व बि – बियाणे चढ्या दराने विक्री केले जात असुन संबंधित दुकानावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव यांनी केली आहे.
तालुक्यात अनेक कृषी दुकानावर खत उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना न देणे , खतांची लिंकिंग करणे , एमआरपी पेक्षा जास्त दराने विक्री करणे , दर पत्रक न लावणे असे अनेक प्रकार कृषी केंद्रावर पहावयास मिळत आहेत. पेरणीची संधी साधून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नयेत म्हणून प्रशासनाने तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर पथक नेमली आहेत. मात्र असे असताना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक सुरु असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने नेमलेले पथक नावालाच असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. तातडीने या सर्व प्रकाराकडे तालुका कृषी अधिकारी , जिल्हाधिकारी , कृषी विभाग यांनी लक्ष घालुन बळीराजाची होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी मराठा सेवासंघ संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव यांनी केली आहे.