
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : धायरी फाटा ते डीएसके रस्ता रुंद होऊनही रस्त्यात विजेचे फिडर पिलर तसेच खांब उभे आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. रस्त्यातील खांब, फिडरमुळे वाहने धडकून मोठ्या दुर्घटनांची शक्यता आहे. पादचार्यांसह वाहनचालकांना ये- जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
धायरी फाट्यापासून गारमाळ, गणेशनगर आदी ठिकाणी रस्त्यावर विजेचे फिडर पिलर आहेत त्या ठिकाणी तसेच ठेवण्यात आले आहेत. रस्ता रुंद करून डांबरीकरण केले मात्र रात्रीच्या अंधारात फिडरला वाहने धडकण्याची शक्यता अधिक आहे. धायरी चौकात तसेच डीएसके दळवीवाडी फाट्यावर रस्त्यातच खांब उभे आहेत.
रस्त्यातील धोकादायक खांब हटविण्यात यावे तसेच ठिकठिकाणचे फिडर पिलर तेथून मागे स्थलांतरित करावे अशी मागणी पुणे प्रशासनाकडे नागरिकांनी केली आहे. याबाबत खडकवासला भाजप ओबीसी आघाडीचे अध्यक्ष अतुल चाकणकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र अद्याप त्याची दखल घेतली गेलेली नाही.