
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
स्वराज्यरक्षक संस्कृत पंडित धर्माभिमानी व्यासंगी आदर्श महावीर समाजकारण राजकारण धर्मकारण संकटावर गरुड झेप घेणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज होता. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचे धोरण सक्षम पणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्तानाला तोंडात बोटे घालावयाला लावणारा महापराक्रमी राजा छत्रपती संभाजी महाराज हा होता.
संभाजी राजे चे बालपण
संभाजीराजांचा जन्म 14 मे सोळाशे 57 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. युगपुरुष शिवाजी महाराजांना पुत्ररत्न झाले. शिवाजी महाराजांचे संभाजी राजे वर अपार प्रेम होते . नशिबाचे दशावतार संभाजीराजांनी लहानपणापासून भोगले. राजे संभाजी दोन वर्षाचे असताना सईबाईंचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊ मासाहेबांनी केला. केशवभट व उमाजी पंडित यांनी संभाजी राजेना उत्तम शिक्षण दिले. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि खूप शूर होते. लहान असल्यापासूनच संभाजी महाराज्यांनी राजकारणातील डावपेच, गनिमी कावा अगदी भरभर आत्मसात केले.
नवव्या वर्षी आग्रा मोहीम .
छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजीराजेना ही सोबत घेतले होते . त्यावेळेस संभाजीराजे अवघ्या नऊ वर्षाचे होते . छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी-महाराजाना मथुरेत ठेवले होते. संभाजीराजांना सुरक्षित स्वराज्यात आणण्यासाठी संभाजी राजेंचे निधन झाल्याची अफवा महाराजांनी पसरवून दिली. त्यानंतर 20 नोव्हेंबर सोळाशे 66 रोजी अगदी सुखरूपपणे रायगडास पोहोचले.
चौदाव्या वर्षी बुधभूषण
संभाजी राजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. तीन भागातील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्र, संगीत ,पुराणे, धनुर्विद्या याचा अभ्यास केलाचा उल्लेख आहे . तसेच राजा आणि त्यांचे गुण, राज्याचे मदतनीस, राजाचे सल्लागार ,राजाचे कर्तव्य, कोश, दुर्ग, सैन्य, हेर व नोकर वगैरेंची माहिती दिली आहे. छत्रपती संभाजी राजे हे एक कुशल संघटक होते.
अजिंक्य संभाजी राजे
छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्य विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याचे पंधरा पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजीमहाराजांनी एक हाती लढा दिला संभाजी महाराज गनिमी कावा पूरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते. संभाजीराजे यांनी आपल्या कार्यकाळात एकूण 120 युद्धे लढली महत्त्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना 120 पैकी एकाही लढाईत अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. संभाजी महाराजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्तानात नव्हता.
उदार धार्मिक लोकनिती
छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण संभाजी राजांनी पुढे चालू ठेवले अनेक देवस्थाने मठ सत्पुरुष यांना वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या संभाजी राजेनी संत तुकाराम यांचा मुलगा महादोबा यास वर्षासन दिले व अनेक जणांना सढळ हाताने मदत केली चिंचवड, मोरगाव ,सज्जनगड, चाफळ, सिंगनवाडी ,महाबळेश्वर,इत्यादी देवस्थानचे व्यवस्थापन योग्य प्रकारे चालावे म्हणून इनामे व सनदा पूर्ववत केल्या.
हौतात्म्यामुळे अजरामर झालेले पराक्रमी पुरुष
1689 च्या सुरुवातीला छत्रपती संभाजी राजेंचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला मराठ्यांचा आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली मराठ्यांची संख्या बळ कमी होते प्रयत्नांची शर्थ करूनही मराठी शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत परिणामी शत्रूने छत्रपती संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोगलांना यश आले संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे नेले. संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे अट औरंगजेबाने घातली होती. मात्र संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार असह्य होऊन सुमारे 40 दिवसांनी फाल्गुन अमावस्या म्हणजेच 11 मार्च1689 रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मावळली .असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणूनच त्यांना अखंड भारत वर्षांनी धर्मवीर ही पदवी बहाल केली.
अशा या थोर धर्मवीराच्या अतुलनीय कार्यास कोटी कोटी प्रणाम व त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन…
– मारोती धर्माजी बट्टलवाड
मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
पांगरी ता.लोहा, जि.नांदेड
मो.नं – 8208493077