
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी-किशोर वाकोडे
बुलढाणा: दि.१३. गेली दोन दशके शेतकऱ्यांसाठी अविरतपणे लढणाऱ्या शेतकरी नेतृत्वाचा कृतज्ञता सोहळा थाटात पार पडला.कष्टकरी, शेतकरी व चाहत्यांनी वर्गणी जमा करून खरेदी केलेली चारचाकी वाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना प्रदान करण्यात आले. तसेच काही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना रविकांत तुपकर मित्रमंडळाकडून भरीव मदतही देण्यात आली.
बुलढाणा येथे १२ जूनच्या रात्री उशिरा हा सोहळा पार पडला. कवी विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल ३ तास रंगलेल्या या कार्यक्रमाला पद्मश्री पोपटराव पवार, बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव ओमप्रकाश शेटे, माजी मंत्री आमदार महादेवराव जानकर, साहित्यिक आणि संपादक संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी बोलताना संदीप काळे म्हणाले, तुपकर हे असामान्य व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. ओमप्रकाश शेटे यांनी लोकसंग्रह, चाहत्यांचे प्रेम, दांडगा जनसंपर्क ही तुपकरांची संपत्ती असून ही संपत्ती अशीच अगणित वाढत राहील अशी खात्री व्यक्त केली. राधेश्याम चांडक यांनी हा सोहळा अभूतपूर्व असून, यानिमित्त एका नवीन राजकीय पर्वाला सुरुवात होत असल्याचे सूचक विधान केले. पोपटराव पवार यांनी शेतकऱ्यासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या तुपकरांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
विठ्ठल वाघ यांनी लोक वर्गणीतून मिळालेल्या वाहनामुळे रविकांत तुपकर यांची चळवळ आणखी गतिमान होईल तसेच रविकांत तुपकर चाहत्यांनी दाखविलेला विश्वास आपल्या कामातून सिद्ध करतील, असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी रविकांत तुपकर यांना गहिवरून आल्याचे दिसून आले. लोकवर्गणीतून मिळालेले हे वाहन व आजचा सोहळा आजवरचा सर्वात मोठा सन्मान असल्याचे तुपकर म्हणाले. भविष्यात आपण जगणार आणि मरणार ते अश्या निस्वार्थ कार्यकर्ते अन चाहत्यांसाठीच, त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, चाहते व शेतकरी उपस्थित होते.
दिवंगत कार्यकर्त्याच्या पत्नी आणि आईच्याहस्ते वाहनाचे पूजन
लोकवर्गणीतून प्रदान करण्यात आलेल्या या लोकरथाच्या प्रथम पूजनाचा मान रविकांत तुपकरांच्या शेतकरी चळवळीतील दिवंगत कट्टर कार्यकर्ते राणा चंद्रशेखर चंदन यांच्या पत्नी किरण आणि आई शांताबाई यांच्याहस्ते झाले.
आमदार महादेवराव जानकर यांची ‘सरप्राईज’ उपस्थिती
माजी मंत्री आमदार महादेवराव जानकर यांचे रविकांत तुपकरांवर लहान भावासारखे प्रेम आहे. कार्यक्रम ऐन बहरात आलेला असताना कार्यक्रमस्थळी आमदार जानकरांच्या ‘सरप्राईज एन्ट्रीने तुपकरांसह सर्वांना आनंदाचा सुखद धक्का बसला. यावेळी आमदार जानकरांनी रविकांत तुपकरांना या अनोख्या जनप्रेमासाठी अभिनंदन करीत भविष्यातील वाटचालीत खंबिरपणे पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली.