
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
बुलडाणा -दि.१४. राष्ट्रीय महामार्ग अजिंठा ते बुलडाणा मार्गावर मढ फाट्यानजीक महानुभाव आश्रमासमोर गिट्टीची वाहतूक करणार्या टिप्परने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात जागीच एकाचा तर दोन मुलांचा रुग्णालयात मृत्यू झाला.अपघातात एक महिला सुद्धा गंभीर जखमी झाल्याची घटना १४ जूनला घडली.
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पानवडोद खुर्द येथील ज्ञानेश्वर गणपत सुरासे (वय ४०) हे पत्नी व दोन भाच्यांसह बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथून पानवडोदकडे दुचाकी क्र. एमएच २० सीडी ०७३० वरून येत असताना मढ फाट्यानजीक असलेल्या महानुभाव आश्रमासमोर भरधाव वेगाने जाणार्या टिप्पर क्रमांक एमएच २८ एबी ७५९४ ने दुचाकीस जोरदार धडक दिली.
धडकेमध्ये ज्ञानेश्वर सुरासे (रा. पानवडोद खुर्द, ता. सिल्लोड) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी वनिता सुरासे (वय ३२) गंभीर जखमी झाल्या. त्यांचेसोबत असलेले अमरदीप रामेश्वर जाधव (वय १५, रा. शिवणी टाका, ता .सिंदखेडराजा, जि.बुलडाणा) व शंतनू वैद्य (वय ९ रा. कोलवड, ता. जि. बुलडाणा) यांचा देखील मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचे तुकडे होऊन ज्ञानेश्वर सुरासे त्यामध्ये चिरडल्या गेले. घटनास्थळी भाजपचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार यांनी तातडीने जखमींना दवाखान्यात जाण्यासाठी मदत केली.
घटनेची माहिती पानवडोद गावी पोहताच गावावर शोककळा पसरली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघातामधील गंभीर जखमी वनिता सुरासे यांना उपचारासाठी बुलडाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर सुरासे यांचे शवविच्छेदन करून रात्री उशिरा त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. तर घटनेतील दोन मुलांचे देखिल त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
कुटुंबातील कर्त्या तरुणावर काळाचा घाला
पानवडोद येथील ज्ञानेश्वर सुरासे घरातील कर्ता तरुण होता. देऊळगाव राजा येथे लग्नसमारंभ आटोपून ते सासुरवाडी कोलवड येथे सोमवारी मुक्कामी थांबले होते. मंगळवारी बहिणीच्या व मेव्हण्याच्या मुलास घेऊन पानवडोद गावी येत होते. परंतु, नियतीने घाला घातल्याने भाच्यासह, मेव्हणाच्या मुलाचा मृत्यू झाला.