
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:पोलिसांनी संजय बियाणी हत्याकांडापासून गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे़ दि़१५ जून रोजी रात्री मालेगाव रोडवरील शिव रोड कॉर्नर येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांपैकी एकाला भाग्यनगर पोलिसांनी पकडले़ मात्र अंधाराचा फायदा घेत अन्य चार आरोपी फरार झाले आहेत़ या कारवाईत आरोपीकडून एका पिस्टलसह पाच जीवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यात खून, दरोडे, मारामा-या अशा घटनात वाढ झाली आहे. महिन्याभरात किमान चार ते पाच खूनाच्या घटनाची नोंद पोलिस ठाण्यात होत आहेत. किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातही आरोपीकडून सर्रासपणे शस्त्रांचा वापर होताना दिसत आहे. त्यात बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांची भर दिवसा हत्या झाल्यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आरोपीकडे नेमके हे शस्त्र येतातरी कुठून हा प्रश्न अद्यापतरी अनूत्तरीत आहे़ गेल्या दिड दोन महिन्यात अनेक गुन्हेगारांना पोलिसांनी शस्त्रासह पकडले आहे. तर दरोडयाच्या तयारीत असलेल्या चार ते पाच टोळया शस्त्रासह पकडण्यात आल्या आहेत. दरम्यान दि़१५ जून रोजीच्या रात्रीही पाचजण सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. सदर बाबीची भाग्यनगर पोलिसांना खबर लागताच, पोलिसांनी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास शहराजवळील खंडोबा चौक ते मालेगाव रोडवरील शिवरोड कॉर्नरजवळील पुलाजवळ पाचजण दरोड्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी मोठ्या शिताफीने यातील रवीलाला उर्फ रवी नारायणसिंग ठाकूर रा़ जूना कौठा यास ताब्यात घेतले.
तर त्याचा साथीदार आनंद यादवसह अन्य तीघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले़ पोलिसांनी रवी ठाकूर ह्याच्याकडून एक पिस्टल, पाच जीवंत काडतूसे, एक दुचाकी असा एकूण ६७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किनगे हे अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान मागच्या आठवड्यातच परभणी येथील हळद विक्री करून जात असलेल्या पिकअप वाहनाला मालेगाव शिवारात अडवून जवळपास पाच लाख रुपयांची नगदी रक्कम लुटल्याची घटना घडली होती़. हे प्रकरण ताजे असताना अशा प्रकारे सशस्त्र दरोड्याच्या तयारी असलेल्या टोळीतील एकाला ताब्यात घेतल्याने पुन्हा एकदा परीसरात खळबळ उडाली आहे़ दरम्यान पोलिस या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेत आहेत.