
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी-दत्तात्रय वा.कराळे
परभणी येथून निघालेल्या आळंदीसाठी पायी वारीत परभणीचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी समस्त वारकरी बांधवाबरोबर अगदी उत्सुफूर्तपणे सहभाग घेतला आहे. टाळ-मृदंगाच्या निनादात अभंगवाणीद्वारे धार्मिक व सांस्कृतिक आनंदाची लयलूट करतांना ते वारकरी बांधवांमध्ये अग्रस्थानी दिसत आहेत.
एका बाजूला राज्यात चालू असलेली राजकीय उलथापालथ व समांतर तर दुसरीकडे देहू-आळंदीच्या यात्रेची नियमित चालणारी वर्दळ सर्वत्र बघायला मिळत आहे. असं असतांनाही खा. जाधव यांनी वारीच्या धामधुमीतही आपल्याबद्दल शंका-कुशंकांना वाव मिळू नये म्हणून प्रारंभी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची व अन्य नेत्यांची धावती भेट घेतली नि विचार विमर्श करुन मन मोकळे केले व मी तुमचाच आहे हे दाखवून देण्यास विसरले नाहीत. खा. जाधव हे परंपरागत धार्मिक वत्तीचे आहेत. आळंदी आणि पंढरीची वारी ते कधीही चुकवत नाहीत. एका बाजूला कडक राजकीय बाणा तर दुसरीकडे निष्ठावंत धार्मिक व सांस्कृतिकपणा अंगिकारलेले संजय जाधव हे भक्तीरसात अगदी न्हाऊन निघतांना दिसतात. अशावेळी ते स्वतःला खासदार असल्याचेही विसरुन जातात नि सोबतच्या सहकारी वर्गाबरोबर टाळ-मृदंग व भजनात अगदी तल्लीन होताना दिसतात. मग वारी आळंदीतील असो वा पंढरीची, यात्रा पाथरीच्या साईबाबांची असो वा जगात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती बालाजीची, अगदी तन-मन-धनाने सहकारी मित्रांबरोबर भाव-भक्तीने ते समरस होत असतात. पाथर्डी हेच मूळ जन्मस्थान असलेल्या श्री साईबाबांच्या सत्यतेसाठीच्या लढ्यातही खा.जाधव यांनी अग्रभागी सहभाग घेतल्याचे वानर निदर्शनास आले आहे. इतकेच नाही तर पाथरीच्या जन्मस्थानाची सत्यता पटवून त्यांनी त्या स्थानाच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडून मोठा आर्थिक निधीही आणल्याची वदंता आहे. भोगाव येथील जाज्वल्य असे श्री मारुतीचे देवस्थान सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्या देवस्थानाच्या भव्य अशा प्रांगणात वर्षानुवर्षे ३६५ दिवस भल्या मोठ्या भंडार्याचे आयोजन केले जाते. कित्येक हजारोंच्या संख्येने भाविक येथे अन्न ग्रहण करीत असतात.
नवसाला पावणारा मारुती म्हणून ख्याती असलेल्या या देवस्थानाच्या विकासासाठी ही खा. जाधव यांनी रुपये पाच लाखांचा निधी दान केल्याचे समजते. परभणी जिल्ह्यातील अशा असंख्य देवी-देवतांच्या मंदीर विकासात त्यांचा हातभार लागत असल्याचा बोलबाला आहे किंबहुना या व अशा भक्तीभाव वृत्तीमुळे आणि त्या त्या देवतांच्या आशीर्वादामुळेच मानवीय विरोधाला न जुमानता ते मागील पंधरा ते वीस वर्षांपासून सातत्याने निवडून येत असतात. मग त्यात आमदारकी असो वा खासदारकी, या माध्यमातून जनसेवेचे सातत्य टिकवून ठेवण्यावर अधिक भर देतात असेही जनतेतून बोलले जाते.