
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
औरंगाबाद, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस विभागांनी सिगारेट, अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यातील तरतुदीनुसार संयुक्तपणे कारवाई करावी. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याला प्राधान्य द्यावे. शिवाय तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थी, तरूण वर्गांमध्ये जागृती निर्माण करावी, अशा सूचना गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महापालिका क्षेत्रासाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक पोलिस आयुक्त कार्यालयात पार पडली. बैठकीस वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.एम. कुलकर्णी, अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त ए.ए.मैत्रे, पत्रकार अण्णा वैद्य, उमंग संस्थेचे डॉ. कार्तिक रामन, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.डी. राठोडकर, सहायक पोलिस निरीक्षक जगदीश पवार, पोलिस उपनिरीक्षक आर.एम. जोंधळे, ए. एस. होनराव, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. अमोल काकड आदींची उपस्थिती होती.
शालेय, महाविद्यालयीन स्तरावर तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती होण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करावे, असेही ढुमे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
जिल्ह्यात मागील तीन महिन्यात जवळपास 70 व्यक्तींविरोधात कारवाई करत दंड वसून करण्यात आला. तंबाखूपासून होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीतून भर देण्यात येत असल्याचे काकड यांनी सांगितले. बैठकीतील सदस्यांनी कायद्याची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी विविध सूचना केल्या.
पोलिस गजानन मांटे यांचा सन्मान
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आयोजित विविध कार्यशाळा, समुपदेशनाचा लाभ घेत पोलिस आयुक्तालयातील पोलिस अंमलदार गजानन मांटे यांनी तंबाखूचे सेवन करणे बंद केले. बऱ्याचदा तंबाखू सेवन बंद करण्याचा विचार त्यांनी केला होता. परंतु या कार्यक्रमांतर्गत मिळालेल्या योग्य मार्गदर्शन आणि मनावर नियंत्रण मिळवत तंबाखूचे सेवन करणे बंद केल्याचे मांटे यांनी बैठकीत सांगितले. समितीच्यावतीने त्यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन् सन्मानित करण्यात आले. तंबाखू सेवन करणाऱ्या इतरांनीही मांटे यांच्याप्रमाणे तंबाखू सेवनाच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन समितीने नागरिकांना केले.