
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नाशिक : येवला दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि नेते छगन भुजबळ यांनी बंडखोर शिंदे गटासह भाजपवर देखील निशाणा साधला. हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना टिकावी, वाढावी अशी इच्छा आहे.
पण, अनेकजण ईडीच्या धाकापोटी शिवसेना सोडून पळाले. आणि भाजपसोबत गेले. शिवसेना स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच मी शिवसेनेत होतो, नाशकातील अनेक शिवसेना शाखांचे मी उद्घाटन केले आहे. अनेक कार्यकर्त्यांना मी शाखाप्रमुख म्हणून नेमले आहे. त्याचमुळे ही संघटना टिकावी, वाढावी असे वाटते, असं भुजबळ म्हणाले.
लग्न झाल्यावर आपण लगेच घटस्फोट घ्या, असं आपण म्हणत नाही. त्यामुळे ‘नांदा सौख्य भरे’ अशा शुभेच्छा मी देतो अशा विनोदी शब्दात भुजबळ यांनी भाषण केले. राज्यातील नवीन सरकारने जनतेचे प्रश्न सोडवावे. अशी अपेक्षा व्यक्त करतो. शिवसेनेत काही मतभेद जरुर असतील, मात्र पक्षच संपावा असे कोणालाच कधी वाटले नाही, असंही भुजबळ म्हणाले.
शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे राष्ट्रीयकृत आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांनी लवकरात लवकर शेतकरी कर्जवाटपाचे काम पुर्ण करावे. तसेच शेतकऱ्यांना खत आणि बियाणे वाटावे. शेतकऱ्यांच्या मालाच्या खरेदी विक्रीची काळजी घ्यावी, असं देखील छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेतील बंडाळीनंतर सेना आपला पक्ष वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. 40 आमदार शिवसेनेतून फुटल्यानंतर आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. तर आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर दावा ठोकत शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्यामुळे शिवसेना आता जोरात कामाला लागली आहे.