
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- किशोर वाकोडे
बुलडाणा:१०: लोकप्रतिनिधींना आपण समाजसेवक मानतो. त्यांच्याकडून जनतेचं भलं होईल, अशी अपेक्षा केली जाते. अर्थात अनेक लोकप्रतिनिधी जनतेच्या भावनांचा आदर करुन चांगले सामाजिक कार्यदेखील करतात.पण काही लोकप्रतिनिधी त्याला अपवाद असतात. काही लोकप्रतिनिधी जनतेला फक्त लुबाडण्याचं काम करतात. पण कायद्यासमोर सर्व सारखी असतात. त्यामुळे जनतेचं नुकसान करणारी माणसं कायद्यापासून लांब पळू शकत नाहीत.
बुलडाण्यात तसाच काहिसा प्रकार समोर आला आहे. एका माजी नगराध्यक्षांच्या पतीने विक्री केलेल्या जमिनीवर तब्बल दोन कोटींचं कर्ज घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित प्रकरण हे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील आहे.
माजी नगराध्यक्षांच्या पतीचं नाव कुणाल बोंद्रे असं आहे. चिखली तालुक्यातील ज्योती वाडेकर यांच्या नावे सर्वे नंबर १०३/५ मधील ३९२ चौरस फूट क्षेत्रफळाची जागा शेख हर्षद शेख इस्त्राईल यांच्याकडून २९ डिसेंबर २००३ रोजी खरेदी केली होती. या जमिनीच्या सातबारासाठी ज्योती या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडे गेल्या होत्या. या दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तक्रारदार ज्योती वाडेकर यांनी अधिकाऱ्यांकडे जमिनीच्या सातबाऱ्यांसाठी मागणी केली तेव्हा ती जमीन त्यांच्या नावावर मिळाली नाही. विशेष म्हणजे संबंधित जमीन ही जमिनीचे मूळ मालक सुरेश अप्पा बोंद्रे, सुभाष आप्पा बोंद्रे, काशिनाथ आप्पा बोंद्रे या तिन्ही भावांनी चिखली अर्बनकडे दोन कोटी रुपयांत तारण ठेवली असल्याचे समोर आले. या माहितीमुळे ज्योती यांना मोठा झटकाच बसला. संबंधित धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर ज्योती वाडेकर यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी चिखली पोलीस ठाणे गाठत या प्रकरणाची तक्रार केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून माजी नगराध्यक्षाचे पती कुणासं बोंद्रे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.