
दैनिक चालु वार्ता कोरपना तालुका प्रतिनिधी -प्रमोद खिरटकर
– बकरी ईद कुर्बानी रविवारी ऐवजी मंगळवारी
– नांदा व बिबी येथील मुस्लीम बांधवांनी जपला सर्वधर्मसमभाव
कोरपना तालुक्यातील बिबी व नांदा या परिसरात हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने आहेत. यंदा हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी व मुस्लिम बांधवांची बकरी ईद एकाच दिवशी आल्याने येथील मुस्लिम बांधवांनी हिंदू धर्माचा आदर करून रविवारी ऐवजी मंगळवारी कुर्बानी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र ही सुफी व संतांची भूमी असून आजही या महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम एकोप्याने राहतात. हिंदू बांधव मुस्लिमांच्या तर मुस्लिम बांधव हिंदूंच्या सणांमध्ये एकत्रित येतात. एकतेची संस्कृती जपणारे हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रितपणे गुण्या-गोविंदाने राहतात. महाराष्ट्राचे दैवत पंढरपूरला पांडुरंगाच्या आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी यात्रा असते. या यात्रेला महाराष्ट्रातून पंधरा ते वीस दिवसापासून पायी चालत वारकरी आपापल्या दिंडीत मोठ्या भक्ती भावाने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. तेव्हा समाजिक बांधिलकी म्हणून सर्वधर्मसमभागाची भावना ठेवून सर्व मुस्लिम बांधवांनी बकरी ईदचा रविवारचा कार्यक्रम रद्द केला आहे. त्याऐवजी फक्त नमाज पठण केली असून बकरी कुर्बानी कार्यक्रम मंगळवारी १२ जुलै रोजी करण्याचे ठरविले आहे. हिंदुच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. अत्यंत आदरपूर्वक व पवित्र राखून हिंदू धर्माच्या एकादशीला मुस्लिम बांधवांकडून मिळालेला हा सन्मान आदर्श असून सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असल्याचे मानले जात आहे. या निर्णयाचे परिसरात स्वागत होत आहे.
आपला देश सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारा, बंधुभाव जपणारा आहे. समाजात एकतेची भावना रुजावी तसेच प्रत्येक समुदायाच्या सण-समारंभाचा आदर करावा हा विचार जोपासणे गरजेचे आहे. सर्व मुस्लीम बांधवांनी हे हा आदर्श निर्णय घेतल्याचे सामाजिक कार्यकर्ते हबीब शेख यांनी सांगितले.यावेळी नांदा येथील गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मारोती जमदाडे, प्रकाश उपरे महाराज, हबीब शेख,शकील शेख, अक्रम शेख, अभिषेक उरकुडे, अभय हनुमते,विनीत निकुरे, साहील मोहीतकर आदी मान्यवर उपस्थित होते.