
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
जि प प्रा शा सुदामवाडी शाळेने आषाढी एकादशी निमित्ताने काढलेली शिक्षणदिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. यामध्ये विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पारंपारिक वेश धारण केलेला असल्याने आणि टाळ वाद्यांच्या गजराने दिंडीला खूप छान स्वरूप आले. नाचत, गात, फुगड्या खेळत चालताना मुलांना विशेष आनंद वाटला .
‘ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली’ च्या जयघोषात दिंडी चालू लागली .
“आपली मुले शाळेत पाठवा, घराघरात ज्ञान ज्योत पेटवा”,
” सहा वर्षाचे मूल त्याचे शाळेकडे पाऊल .” अशी घोषवाक्य म्हणत विद्यार्थ्यांनी परिसर दुमदुमून टाकला.
शाळेच्या प्रांगणात संतांच्या चरित्राबद्दल, वारीबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली. अभंग, गवळन तसेच विद्यार्थ्यांनी काढलेल्या संतांच्या चित्रांचेही सादरीकरण केले गेले. मुख्याध्यापक संजय शिंदे आणि केंद्रप्रमुख अशोक त्रिभुवन यांनी मिशन झिरो ड्रॉपआऊट संकल्पना स्पष्ट करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . शेवटी गुळ शेंगदाण्याच्या प्रसादाने दिंडीची सांगता झाली. याप्रसंगी शिक्षक संजय जाधव, मनोज सोनवणे, सुयोग बोराडे, रामदास पवार, श्रीमती ज्योती निकमसह विद्यार्थी, माता पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.