
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
प्रतिकुल परिस्थितीत कारखान्याने दायित्व पार पाडून हंगाम यशस्वी केला.
विकासनगर :– चालू गळीत हंगामातील गळीत ऊसाचा एफ आर पी नुसार होणारा तिसरा हप्ता रुपये २५५.६१( प्रती मे.टन) प्रमाणे कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख,राज्याचे माजी मंत्री तथा कारखान्याचे संचालक आ.अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी जाहीर केला आहे.यानुसार चालू वर्षातील एफआरपी नुसार अंतिम दर एकूण २६५५.६१ एवढा निश्चित झाला आहे.
लोकनेते विलासराव देशमुख यांनी शेतकरी सभासदांना त्याच्या कष्टाचे मोल करत सर्वाधिक ऊस दर देवून ग्रामीण व शहरी भागाचा विकास साधला.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याने स्थापनेपासून ते आज पर्यंतचे सर्व गळीत हंगाम यशस्वी केले आहेत.चालू गळीत हंगाम हा आज पर्यंतच्या सर्व हंगामा पेक्षा वेगळा ठरला. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने साखर कारखानदारी समोर मोठा प्रश्न ऊस गाळपाचा निर्माण झाला होता. अशा प्रतिकुल परस्थितीत मांजरा परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, तत्कालीन पालकमंत्री आ. अमित विलासराव देशमुख, आ.धिरज विलासराव देशमुख यांनी वेळोवेळी दैनंदिन गाळपाचा आढावा घेवून अधिका-यांना सुचना देवून कार्यक्षेत्रातील सर्व ऊस गाळप करूनच कारखाना गळीत हंगामाची सांगता केली.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याने एफआरपी नुसार होणारी पहिली उचल रक्कम प्रति. में. टन रू. २२००/-(दोन हजार दोनशे) व दुसरा हप्ता २००/- (दोनशे) व आता तीसरा हप्ता २५५.६१/-असे एकूण रुपये २६५५.६१/- एवढा अंतिम दर देण्यात आला आहे.
यानुसार चालू गळीत हंगामात विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून २९८ कोटी ३७ लाख एवढी रक्कम शेतकरी सभासदांना अदा करण्यात आली आहे.
तिसरा अंतिम हप्ता नुसार होणारी २१.९८ कोटी एवढी रक्कम संबंधित शेतक-यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन श्रीशैल उटगे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी दिली आहे.