
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:मुसळधार पावसानंतर सोमवारी केवळ एक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाची मंगळवारी सकाळपासूनच नांदेड जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली आहे़ गोदावरी नदी पात्रात पाण्याचा येवा वाढत आहे़ यामुळे दुपारी अडीचच्या सुमारास विष्णुपुरी प्रकल्पाचा एक तर बळेगाव बंधा-याचे दोन दरवाजे उघडण्यात येऊन ३७७ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे़.नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस होत आहे़ शुक्रवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला होता़ यामुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती़ या गंभीर परिस्थितीनंतर पावसाचा जोर कमी झाला होता.
सोमवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली़ मात्र मंगळवारी सकाळपासूनच नांदेड जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू झाला आहे़ हवामान खात्याने नांदेड जिल्ह्यात उद्या दि़ १३ रोजी पुन्हा अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे़ खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेच्या वतीने अतीवृष्टी भागातील व गोदावरी नदी काठावरील नागरीकांना सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत होण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.तर सध्या पावसाची संततधार व विष्णुपूरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गोदावरी नदीत पाण्याचा येवा वाढला आहे़ यामुळे शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प ८० टक्के क्षमतेने भरला असून प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे विष्णुपुरी बंधा-याचा एक दरवाजा मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास उघडून ३७७ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे