
दैनिक चालु वार्ता पारनेर प्रतिनिधी-विजय उंडे
तहसील कार्यालयासमोर करणार जागरण गोंधळ आणि पेढे तुला
पारनेर:-शेती गट क्रमांकावरील शर्ती शेरा कमी करण्याचे काम तब्बल सात महिने आडवून ठेवून आदेशावर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांना सद्बुद्धी सुचावी यासाठी बाजार समितीचे माजी सभापती,भा.ज.प.नेते सोन्याबापू भापकर हे तहसील कार्यालयासमोर सोमवार दि.१८जुलै रोजी कुलदैवत खंडेरायाचे जागरण गोंधळ करणार असून अर्जदाराची पेढे तुला करण्यात येणार आहे.भापकर यांच्या आंदोलनाची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली असून महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण
भापकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार त्यांचे वडील प्रभाकर बापूसाहेब भापकर यांची मौजे वडुले येथील गट क्रमांक २१८वरील नवीन शर्त शेरा कमी करण्यासाठी त्यांनी दि.१७नोव्हेंबर २०११रोजी अर्ज दाखल केला होता.त्यावर काहीही कार्यवाही न झाल्याने दि.२८एप्रिल रोजी भापकर यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली.त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महसूल प्रशासनाने सदर जमीन शासन जमा करण्याबाबत नोटीस जारी केली.
पुढे दि.२मे व १०मे रोजी सुनावणी घेण्यात येऊन चलन भरण्याचे आदेश देण्यात आले.दि.२९जून रोजी नवीन शर्त कमी करण्याबाबतच्या स्थळप्रतीवर (ओ.सी.)सही करून तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी आदेश काढला.मात्र अंतिम आदेशावर सही करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.दि.१७नोव्हेंबर२०२१पासून दि.२९जून२०२२पर्यंतचे सर्व प्रकरण नियमात असताना तब्बल सात महिन्यांचा कालावधी लावण्यात आला.आताही अंतिम आदेश देण्यात चालढकल करण्यात येत आहे.
स्थळ प्रतीवर (ओ.सी.)सही करून १४दिवस उलटले तरी अंतिम आदेश पारित करण्यासाठी तहसीलदार आवळकंठे यांना कुलदैवत खंडेराया यांनी सद्बुद्धी द्यावी यासाठी जागरण गोंधळ घालून प्रसाद रुपी अर्जदाराची पेढे तुला करण्यात येणार आहे.या आंदोलनाची नोंद घेऊन तहसीलदारांनी प्रसादासाठी येण्याचे आमंत्रण भापकर यांनी दिले आहे.