
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून,सद्यस्थितीत पावसाळा सुरू असतांना रस्त्यांवरील वाहनचालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार असते.रस्त्यांवर आपली गुरे-ढोरे सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुध्द नगरपालिकेने कडक कारवाई करण्याची गरज आहे.मात्र या समस्येपासून नागरिकांनी सुटका करण्यात नगरपालिका कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने नगरपालिका हतबल झाली आहे की काय असा प्रश्न पडतो.शहरातील विविध रस्त्यावर ठिक-ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाटे जनावरे कळपा-कळपाने फिरत आहेत तर रस्त्याच्या मध्यभागी थांबून रस्त्यावर बसत आहेत.यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.काही रस्त्यावर अचानकपणे हे मोकाट जणावरे रस्ता ओलांडत असल्याने वाहनधारकांचे अपघात होत आहेत.तर वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्याने नागरिक रोष व्यक्त करत आहेत.
मोकाट जनावरांमुळे कुठे-कुठे वाहतुकीला अडथळा
अंजनगाव-अकोट हाई-वे,बस्थानाक चौक,अंजनगाव-दर्यापूर रोड,तहसील रोड,शनिवारा-पान अटाई रोड अशा विविध शहरातील सतत रहदारी असणाऱ्या रस्त्यावर ही जनावरे घोळका घालून बसतात.अशा रस्त्यांवरून वाहनचालक,पादचारी,वृद्ध,शाळकरी मुले यांना रस्ता पार करण्याची कसरत करावी लागते.तसेच भाजीपाला विक्रेत्यांसह अनेक छोट्या व्यावसायिकांना या मोकाट जनावरांच्या उपद्रवाचा मोठा फटका बसत असतो.
कायदा आहे पण वापर कोण करणार ?
केंद्र,राज्याचे कायदे पशू क्रूरता नियम व अधिनियम १९६०,मुंबई पोलिस कायदा १९५१,महाराष्ट्र शहरी भागात जनावरांना बाळगणे व त्यांचा संचार नियंत्रित कायदा १९७६ असे विविध कायदे आहेत.या अंतर्गत दंडात्मक कारवाई आणि कारावास अशा शिक्षेचीही तरतूद आहे.मुंबई पोलीस कायदा-कलम ९०अ,११८ नुसार मालकांविरुद्ध याप्रकरणी कारवाई करता येते.जनावरे मालकांना यात एक महिन्याची शिक्षा व ३ हजार रुपयांचा दंड करण्यात येतो.असा प्रकार सातत्याने करण्यात येत असेल तर ५ हजार रुपयांचा दंड व सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद आहे.नगरपालिका कर्मचाऱ्यांना अशी कारवाई करण्यात रोखण्याचा प्रयत्न केल्यास सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी कारवाई करण्यात येते.या तक्रारीशिवाय नेहमीच्या तक्रारीनुसार प्रत्येक गुरामागे ५५० रुपयांचा दंड आणि गुराच्या रोजच्या चाऱ्यापोटी ६० रुपये शुल्क जनावरांच्या मालकाकडून आकारण्यात येतो.