
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर प्रतिनिधी, शिक्षण हा चिंतन मननाचा विषय आहे. व्यक्तीच्या ठाई असणारी अंगभूत गुणवत्ता प्रकट होण्यासाठी शिक्षण हे एक माध्यम असले पाहिजे. परीक्षेतील गुण म्हणजे गुणवत्ता ही संकल्पनाच मान्य नसणारे पु.ग.वैद्य हे शिक्षणातील खरे आनंदयात्री होते असे मत नागनाथ सोमवंशी यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात आयोजित व ग्रंथ मित्र दीपक बलसुरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 269 व्या वाचक संवाद मध्ये नागनाथ सोमवंशी यांनी प्रा.मिलिंद जोशी संपादित शिक्षणातील आनंदयात्री या साहित्यकृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाले की उपेक्षित, नाकारलेला विद्यार्थी हा कार्याच्या केंद्रस्थानी मानून सर्जनशीलता, प्रयोगशीलता, आणि कृतीशीलता यांचा अंगीकार करत रंजन , प्रबोधन आणि संस्करण या सूत्राने शिक्षण देण्याचा प्रयत्न करणारे पु.ग.वैद्य यांच्याबद्दल अभ्यासपूर्वक लेखनाचे संपादन करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे असे ते म्हणाले.
शेवटी अध्यक्षीय समारोपात ग्रंथ मित्र दीपक बलसुरकर म्हणाले की आपण किती खाल्लं यापेक्षा आपल्याला पचन किती झाले हे महत्त्वाचं आहे. शिक्षणा संबंधी असेच विचार घेऊन जगलेले भाई वैद्य यांच्या कार्याची उकल या पुस्तकात केली आहे. सोमवंशी यांनी त्यावर सुंदर संवाद साधला याबद्दल त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचलन प्रा.राजपाल पाटील यांनी तर आभार गोविंद सावरगावे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी संयोजक अनंत कदम, हनुमंत म्हेत्रे, विरभद्र स्वामी, आनंद बिरादार,रामभाऊ जाधव, तुळशीदास बिरादार, बाबुराव सोमवंशी आदींनी परिश्रम घेतले.