
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -राहुल रोडे
लातूर शहरातील जुना औसा रोड भागात तीन युवकांनी हातात कत्ती घेऊन राडा घातला. दिसेल त्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या, कत्तीने वार करून तिघांना जखमी तर काहींचे मोबाईल देकील हिसकावून घेतले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तिघांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या मारहाण प्रकरणी स्वप्नील शिवराज इंडे याने तक्रार दिली आहे. स्वप्निल हा महादेव माळी यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करतो. महादेव माळी यांच्यासोबत तो १९ जुलै रोजी लातूर येथे आला होता. त्यांची गाडी त्याने मोहन सांगवे याच्या घराजवळ थांबवली व तो गाडीत बसून होता. त्याच वेळी तीन युवक त्याच्याजवळ आले. त्यांनी पैशाची मागणी केली, पैसे नाहीत म्हटल्यानंतर एकाने हातातील कत्तीने त्याच्यावर वार केला. तो वार स्वप्निलने हाताने अडवला असता हाताला जखम झाली. इतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गाडीचे काच फोडून निघून गेले. थोडे पुढे गेल्यावर त्यांनी विकास एकुरगे, विरभद्र स्वामी यांनाही कत्तीने मारहाण केली. विकास एकुरगे याच्या हातातील मोबाईल त्यांनी हिसकावून घेतला. रस्त्यामध्ये दिसेल त्या वाहनांच्या काचा त्यांनी फोडल्या.
अजिंक्य मुळे, ओम यादव आणि संकेत तावरे अशी राडा घालणाऱ्या तरुणांची नावे असल्याचे समजते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या तिघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे लातूरातील जुना औसा रोड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले होते. या पुर्वीही असा प्रकार घडलेला होता.